संगीतात रमलेलं मोझार्टचं साल्झबुर्ग

लहानपणी, शाळेत असताना बाबांनी मला ‘साउंड आॅफ म्युझिक’ चित्रपट फार हौसेने दाखवला होता. त्यात मला साल्झबुर्गचं पहिलं दर्शन घडलं आणि मी या शहराच्या प्रेमातच पडले! साल्झबुर्गच्या रस्त्यांवरून, बागांमधुन गात-गात मनसोक्त हुंदडणारी मरिया आणि ती सात मुलं, ‘I have confidence’ म्हणत रस्त्यावरून जाणारी मरिया, ते चर्च, डोम्स, पॅलेसेस…साल्झबुर्गची अशी अनेक चित्र माझ्या डोळ्यासमोर तयार झाली होती. ‘साउंड आॅफ म्युझिक’ची नंतर कितीतरी वेळा पारायणं झाली. खरोखर साल्झबुर्ग इतकं गोड, सतत गाण्यात रमलेलं शहर असेल का?- असा प्रश्न नेहेमी ‘साउंड आॅफ म्युझिक’ पहाताना पडायचा. मोठं झाल्यावर एकदातरी या शहरात जायचंच असं स्वप्नं पाहिलं होतं मी! आणि आत्ता नुकताच, जर्मनीमध्ये आल्यावर जवळजवळ पावणे-दोन वर्षांनी मला तो चान्स मिळाला.

इथे रहाणारे आम्ही विद्यार्थी इंटर्नशिप किंवा स्टूडंट-जॉब करायला लागलो की थोडं-थोडं कमवू लागतो. त्यामुळे बेसिक गरजा त्यात भागवून आमच्या आवडीच्या गोष्टींवर पैसे खर्च करण्याचा स्कोप आम्हाला मिळतो. मी अर्थातच सध्या बरेचसे पैसे भटकंती आणि पुस्तकांवर खर्च करत असते. साल्झबुर्गला जायची फार इच्छा होती आणि त्याचे प्लॅन्ससुद्धा दोन-तीनदा होऊन फिसकटले होते. असं झालं की अजुनच उत्कंठा वाढते बहुदा! त्यामुळे एकदा असं एकदम तडका-फडकी ठरलं की- चला पुढच्या वीकेण्डला साल्झबुर्ग गाठायचं! युरोपमध्ये ओपन बॉर्डर्स असण्याचा हा फार मोठा फायदा! म्युनिकपर्यंतच्या प्रवासाचं बुकिंग झालं! बर- जर्मनीत राहाणाऱ्या आमच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती- साल्झबुर्ग ऑस्ट्रीयामध्ये येत असलं तरी ते बायर्न तिकिटात येतं. रिजनल ट्रान्स्पोर्ट वापरून साल्झबुर्गला एका दिवसात जाऊन येऊ शकतो! साल्झबुर्गच्या रेल्वेस्थानकावर ‘साल्झबुर्ग कार्ड’ मिळतं. २४/४८/७२ तासांचं ! आम्ही २४ तासाचं घेतलं! तुमच्याकडे गाडी नसेल तर हे कार्ड फार उपयोगी पडतं! त्यात सगळा पब्लिक-ट्रान्सपोर्ट आपण वापरू शकतो आणि शहरातल्या मुख्य प्रेक्षणीय स्थळांना भेटही देऊ शकतो. कार्डबरोबरच आपण तिथे मॅप आणि ब्रोशर्स सुद्धा घेऊ शकतो. मॅप्समुळे बसरुट्सची माहिती चटकन मिळते.

पहिल्यांदा आम्ही उंटर्सबर्ग या ऑस्ट्रीयन आल्प्समधल्या एका डोंगरावर गेलो. ‘साउंड आॅफ म्युझिक’ चित्रपटाचं सुरुवातीचं आणि शेवटचं चित्रिकरण या भागात झालेलं आहे . म्हणजे बहुदा मरिया(ज्युली अँन्ड्रीव्ज)वर चित्रित झालेलं ‘The hills are alive with the sound of music’ हे गाणं असावं आणि शेवट म्हणजे व्हॉन ट्रॅप कुटुंब जेव्हा स्वित्झर्लण्डला पळून जातं तो भाग असावा! उंटर्सबर्ग ही जर्मनी आणि ऑस्ट्रीयामध्ये पसरलेली पर्वतरांग. साल्झबुर्ग जवळचं गायरएक(Geiereck) हे स्टेशन १७७६मीटर उंचीवर आहे. १० मिनिटांच्या लिफ्टने आपण या टोकावर पोहोचू शकतो. वरून ३६० डिग्री मधे दिसणारा पॅनोरामा निव्वळ अप्रतिम आहे. जर्मनीमधलं Berchtesgaden सुद्धा इथून दिसतं पण अर्थातच हवामान चांगलं असेल तर! आम्ही गेलो तेव्हा काही वेळ धुक्यामुळे व्हिझिबिलिटी चांगली नव्हती. इथे वर काही रेस्तराँज आणि रिफ्रेशमेंट हाउसेस आहेत. तिथे ऑस्ट्रीयन पद्धतीने केलेले वेगवेगळे पदार्थं मिळतात. लिफ्टमधून वर जाताना हळू-हळू कानांत किंचित दडे बसायला लागतात, लिफ्टचे स्लोप्स बदलताना पोटात गोळा येतो एकदम, वर जातो तसा गारठा वाढत जातो. वसंत ऋतूतसुद्धा अनेकवेळा बर्फ असू शकतो. पण लिफ्टमधून वर जाताना दिसणारं दृश्य, वरून दिसणारा पॅनोरामा आणि आजुबाजुचा इतका सुंदर निसर्ग यापुढे हे सगळं नगण्य आहे!

hdr

उंटर्सबर्गच्या लिफ्ट मधून जाताना टिपलेला फोटो

 

hdr

उंटर्सबर्ग वरून खाली दिसणारं साल्झबुर्गरलॅण्ड

परत साल्झबुर्गच्या दिशेने जाताना मध्ये हेलब्रुन पॅलेस आणि साल्झबुर्ग झू लागतं. हेलब्रुन पॅलेस मध्ये सुद्धा ‘साउंड आॅफ म्युझिक’चं चित्रीकरण झालं आहे आणि झू अत्यंत सुरेख आहे. लहानपणी पेशवे पार्क किंवा कात्रजचं झू पाहिलं होतं. त्यानंतर बहुदा हेच! पृथ्वीवरच्या खंडांप्रमाणे वेगवेगळ्या प्राण्यांच्या अरेंजमेंट्स, त्यांची लहान मुलांना आवडेल अशा प्रकारे पण व्यवस्थित शास्त्राला धरून लिहिलेली माहिती, प्राण्यांसाठी जाणिवपुर्वक तयार केलेलं habitat! सगळंच एकदम मस्त!

hdr

साल्झबुर्ग झू मधले फ्लेमिंगोज. विशेष म्हणजे त्यांना अजिबात बंद पिंजऱ्यात कोंडलेलं नव्हतं.

परत बसने आम्ही साल्झबुर्ग शहरात पोचलो. साल्झाख नावाची नदी साल्झबुर्ग मधून वाहते. साल्झबुर्गमध्ये या नदीवर अनेक पूल आहेत. यातला मोझार्ट ब्रिज(Mozartsteg) वर ‘साउंड आॅफ म्युझिक’ मधल्या ‘डो-अ -डियर’ गाण्याच्या काही भागाचं शुटींग झालं होतं. आता इथून पुढे जाऊन जुन्या साल्झबुर्ग मधून वावरताना आपण सिनेमाच्या दृषयांचा एक भागच आहोत असा फील आल्यावाचून रहात नाही. नदीच्या दोन्ही बाजुनी पादचारी आणि सायक्लिस्टस करता दोन वेगवेगळे ट्रॅक्स आहेत. बसण्याकरता बाक आहेत. त्यावर किंवा तिथल्या हिरवळीवर शांतपणे ऊन खात बसलेली, कुठे पुस्तक वाचत बसलेली, कुठे गाणी ऐकत किंवा गात बसलेली किंवा निवांत गप्पा मारत बसलेली मंडळी दिसतात. कितीतरी लोकं सायकलवरून नदीचा काठाने मजा करत जात असतात. नदीच्या एका तीरावरून समोर वरच्या बाजूला आपल्याला होहनसाल्झबुर्गचा किल्ला दिसत असतो. काही डोम्स,चर्चेस आणि कथेड्रल्स दिसत असतात. नदी ओलांडून हळू-हळू आपण आत-आत जुन्या साल्झबुर्गमध्ये शिरतोय याची जाणिव आपल्याला आजुबाजुच्या इमारतींच्या आर्किटेक्चरमधून समजायला लागते.

IMG_7908

होहनसाल्झबुर्ग फोर्ट्रेसमधून काढलेला फोटो- साल्झाख नदी आणि तिच्या दोन्ही बाजुंनी वसलेलं साल्झबुर्ग. फोटो क्रेडिट्स-निखिल गोडसे

hdr

साउंड ऑफ म्युझिक मधल्या एका प्रसंगाचं चित्रीकरण झालेला हा मोझार्टस्टेग

hdr

साल्झबुर्ग मधलं सगळ्यात जुनं पुस्तकांचं दुकान

hdr

१७०३ मध्ये सुरु झालेलं साल्झबुर्ग मधलं पाहिलं कॅफे- कॅफे टोमासेली. हे सुरु करणारा टोमासेली इटलीहून आला होता आणि मोझार्ट आणि त्याची चांगली मैत्री झाली होती म्हणे!

IMG_7920

कापिटेलप्लाट्झ वरचा Sphaera. फोटो क्रेडिट्स-निखिल गोडसे

IMG_7889

या घोड्यांच्या कारंज्या भोवती मारिया ‘आय हॅव कॉन्फिडन्स’ गातानाचा ‘साउंड ऑफ म्युझिक’ मध्ये एक सीन आहे. फोटो क्रेडिट्स-निखिल गोडसे

IMG_7897

९०० वर्षांपूर्वी बांधलेल्या चर्चमध्ये चाललेली प्रार्थना . फोटो क्रेडिट्स-निखिल गोडसे

hdr

डो-अ-डियर या साउंड ऑफ म्युझिक मधल्या गाण्यातल्या एका दृश्याचं इथे चित्रीकरण झालं आहे

IMG_7836

डो अ डियर या गाण्याच्या एका दृष्याचं मीराबेल पॅलेस मधल्या या कारंज्यापाशी चित्रीकरण झालं होतं. फोटो क्रेडिट्स- निखिल गोडसे

IMG_7814

डो अ डियर या गाण्याच्या एका दृष्याचं मीराबेल पॅलेस मधल्या या कारंज्यापाशी चित्रीकरण झालं होतं. फोटो क्रेडिट्स- निखिल गोडसे

रेसिडेन्स स्क्वेअर, कॅथेड्रल, होहनसाल्झबुर्ग फोर्ट्रेस,तिथुन दिसणारं जुनं साल्झबुर्ग, असंख्य म्युझियम्स, चर्चेस, साल्झबुर्ग मधलं १७०३ मध्ये सुरु झालेलं पाहिलं कॅफे-Café Tomaselli, सगळ्यांत जुनं पण क्लासी फील असलेलं पुस्तकांचं दुकान- Buchhandlung Höllrigl, मार्केटप्लेस, Getreidegasse, Goldgasse नावाच्या गल्ल्या, ब्रिज पलीकडलं ‘साउंड आॅफ म्युझिक’च्या चित्रीकरणाचे स्पॉट्स असलेलं मीराबेल पॅलेस, बग्गीत बसून मारिया त्या सात मुलांना डो-अ-डियर शिकवतानाचा सीन आठवतोय? रस्त्यात दिसणाऱ्या तश्या बग्ग्या – आणि या सगळ्यासहित या शहरांत आपल्याबरोबर सतत बॅकग्राउंडला असलेलं मोझार्टचं संगीत! बऱ्याचवेळा रस्त्यावरच वेगवेगळी वाद्य वाजवणाऱ्या-गाणाऱ्यांकडून ऐकू येणारं आणि कधी त्या शहराच्या भारलेपणामुळे आपोआपच ऐकु येतंय याचा फील देणारं! मोझार्टचा जन्म साल्झबुर्ग मधला. त्याला साल्झबुर्गचं ‘वुन्डर किंड'(वंडर चाईल्ड) म्हणालं जातं. Number 9, Getreidegasse हा पत्ता वोल्फगांग अमाडेऊस मोझार्टने तिथे जन्म घेऊन जगप्रसिद्ध बनवला. इथे मोझार्ट पुढे १७ वर्षं राहिला. नंतर तो आणि त्याचं कुटुंब साल्झबुर्ग मधेच दुसऱ्या घरात हललं. गेट्रायडंगासं या गल्लीत त्याकाळी राहत असणाऱ्या किंवा नेहेमीची ये-जा असणाऱ्या लोकांनी रोज लहानश्या मोझार्टला ऐकलं असेल नाही का?!! बॉनमध्ये असं बिथोवनचं घर आहे. इथे जसं सगळं ‘मोझार्ट’मय तसं तिथे सगळं ‘बिथोवन’मय! साल्झबुर्ग मधलं मोझार्टचं घर काय किंवा बॉनमधलं बिथोवनचं घर काय- किंवा अगदी आपल्याकडे देवास मधलं कुमार गंधर्वांचं घर किंवा पुण्यातलं पुलंचं घर, किंवा माझ्या नाशकातलं कुसुमाग्रजांचं घर काय, किंवा जगातल्या कुठल्याही चांगल्या मोठ्या कलाकाराचं घर म्हणूया! पाहिल्या तर नुसत्याच वास्तु आहेत! बिथोवन आणि मोझार्टच्या बाबतीत त्या वास्तुचं तर म्युझियम सारख्या टुरिस्टिक ठिकाणात रूपांतर झालंय. पण तरी त्याही पलीकडे जाऊन या वास्तुंमधे काहीतरी वेगळं असतं असं मला वाटतं! कुठलीतरी पॉझिटिव्ह आर्टिस्टिक एनर्जी असते, कुठल्यातरी व्हेव्ज असतात ज्यामुळे तो कलाकार तिथे अस्तित्वात नसला तरी त्याचं अस्तित्व जाणवतं!

hdr

मोझार्टचा या घरात जन्म झाला

hdr

वोल्फगांग अमेडेउस मोझार्ट

म्हणता-म्हणता एक अख्खा दिवस फारच लवकर संपल्यासारखं वाटलं. पण साल्झबुर्ग संपलं नव्हतं अजुन! बहुदा माझ्याकरता ते कधी पाहून, अनुभवून संपणारच नाही असं वाटतं मला! साल्झबुर्गच्या जगप्रसिद्ध मिठाच्या खाणी पाहायच्या राहिल्यात अजुन, साल्झबुर्ग जवळ वेर्फेन इथल्या जगातल्या सगळ्यात मोठ्या आईस-केव्ह्ज पाहायच्या आहेत. तिथेच जवळ चित्रातल्या गावासारखं दिसणारं हालस्टाट नावाचं गोड गाव आहे-ते पहायचंय. तिथल्या साल्झकामेरगूट नावाच्या तलावात फेरी-बोट मधुन मनसोक्त फिरायचंय, ‘साउंड आॅफ म्युझिक टुर’ करायची आहे. आणि या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यापलीकडे जाऊन रोजचं खरंखुरं साल्झबुर्ग अनुभवायचंय- वीकेंड्सना कधीतरी तिथल्या कॉन्सर्टला जायचंय, कॅफे टोमासेलीमध्ये कधीतरी येता-जाता असंच सहज निवांत बसून ‘काफे उंड कुखन'(कॉफी आणि केक)ची मजा घ्यायची आहे, तिथली म्युझियम्स निवांतपणे पालथी घालायची आहेत-एखाद्या टुरिस्ट सारखं घाईघाईत नाही हां, साल्झाख नदीच्या किनाऱ्यावर मस्त पुस्तक वाचत बसायचं आहे, नदीच्या काठाने सायकल चालवत लांब लांब जायचंय. आणि हो! जास्त काळ राहण्याची सुदैवाने संधी मिळालीच तर मोझार्टच्या या गावात पियानो किंवा व्हायोलिनचे धडे ही घ्यायचेत! पाहूया ही सगळी स्वप्न कधी पूर्ण होतात ते! सध्यातरी ‘साल्झबुर्गला एकदा तरी जायचंच’ हे स्वप्न पूर्ण झाल्याच्या आनंदात, तिथलं आनंदी वातावरण मनात साठवून घेत मी घरी परतल्ये!

 

12 thoughts on “संगीतात रमलेलं मोझार्टचं साल्झबुर्ग

  1. Ravindra Kashelkar says:

    What an article !!! After reading the article I felt at least once I must visit Salzburg with my dear ones. Now I know something about this heaven like city.

    Like

  2. Dr. Rama Wadikar says:

    Mast lihilays, Minu! Khup chaan describe kela ahes. Dolyasamor city ubhi kelis😊 All the best for ur dream to learn piano👍

    Like

Leave a comment