आर्नहेम-बरोबर ७४ वर्षांपूर्वी!

साधारण ९वी -१०वीच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात आम्हाला ‘पहिलं आणि दुसरं महायुध्द’ होतं. परीक्षेच्या दृष्टीने तर उत्तरं, सन-सनावळ्या पाठ करा, पुन्हा-पुन्हा लिहून पहा हे बोअरिंग प्रकार केलेच. पण त्यावेळेला बाबा मला इतिहास-भूगोलाचे धडे समजावून सांगायचे. महायुद्धाचा इतिहास शिकवताना जगाचा नकाशा पसरुन कोणी कुठून कुठे आक्रमणं केली, कुठली लढाई कधी-कुठे हे सगळं बाबा गोष्ट सांगितल्या सारखं सांगायचे. आणि माझ्या बरोबरीने माझी बहीण आणि माझी आई सुद्धा एखादी गोष्ट ऐकल्यासारख्या डोळे विस्फारून ऐकत बसायचो. मधूनच प्रश्न विचारायचो. नॉर्मंडी, पर्ल हार्बर, डंकर्कची युद्ध डोळ्यासमोर उभी रहायची. असा आमचा सहकुटुंब इतिहासाचा तास चालायचा हे मला अगदी नीट आठवतंय! मग त्याच्या भरीला त्या-त्या लढायांवर आधारलेल्या काही चित्रपटाच्या सीडीज आई-बाबांनी आणल्या होत्या- पॅटन, गन्स ऑफ नॅव्हरॉन, टोरा-टोरा-टोरा, सेविंग प्रायव्हेट रायन सारखे काही सिनेमे पाहिल्याचं आठवतंय अजून! काही चित्रपट नंतर नंतरच्या परीक्षेच्या गडबडीत पाहायचे राहून गेले होते. त्यावेळेला इतिहास- विशेषतः जागतिक इतिहास -हा विषय खरोखर खूप आवडायला लागला होता. दहावीनंतर बारावी सायन्स-इंजिनिअरिंग करताना सगळं मागे पडलं. वेळ मिळाल्यावर एखादं पुस्तक वाचलं जायचं किंवा एखादा चित्रपट पाहिला जायचा. पण आता जर्मनीशी संबंध आल्यामुळे पुन्हा बऱ्यापैकी महायुद्धांबद्दल वाचलं जातं, पाहिलं ऐकलं जातं आणि मित्रांमध्ये-बाबांबरोबर चर्चाही होत असतात.

नोकरीनिमित्त नुकतीच मी ड्युसलडॉर्फला आल्यामुळे हॉलंड, बेल्जीयम हे देश माझ्या बऱ्यापैकी जवळ आलेत. लगेच बाबांनी मला- चान्स मिळाला की हॉलंडमध्ये आर्नहेमला जाऊन ये कधीतरी- असं सजेशनही दिलं होतं. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की हॉलंडजवळ आहे तर ऍमस्टरडॅम, रॉटरडॅम, मास्टरीष्ट, ऊटरेश्ट, गीथरून सारखी ठिकाणं सोडून हे आर्नहेम कुठून शोधून काढलं भेट द्यायला? तर- आर्नहेम हे पूर्व हॉलंड मधलं, ऱ्हाईन नदीवरचं जर्मनीच्या सीमेच्या एकदम जवळ असलेलं छोटंसं गाव आहे. दुसऱ्या महायुद्धातली एक खूप महत्वाची लढाई इथे झाली. रिचर्ड अटेनबरो सारख्या दिग्ग्ज दिग्दर्शकाने या लढाईवर आधारित ‘A Bridge Too Far’ नावाचा अजरामर चित्रपट १९७७ साली केला होता. (रिचर्ड अटेनबरोने गांधीजींवर ‘Gandhi’ हा चित्रपट सुद्धा तयार केला होता. त्यामुळे अटेनबरो सर्वसामान्य भारतीय माणसाला जनरली माहीत असतो.)

योगायोगाने माझ्या एका आर्किटेक्ट मित्र- शार्वेयने मला सांगितलं की त्याला एखाद्या शनिवारी आर्नहेमला जायची इच्छा आहे आणि त्याच्याकडच्या विकेंड पासवर त्याला अजून एका व्यक्तीला नेता येणं शक्य आहे. तो म्हटला – तू येत्येस का?- आर्नहेम म्हटल्यावर मी नाही म्हणणं शक्यच नव्हतं. ‘A Bridge Too Far’ मी १०वीत असताना पहिला होता की नाही हे आता मला आठवत नाही पण आर्नहेमला जायचं ठरल्यावर तो पुन्हा पाहिला. त्या लढाईबद्दल शक्य तितकं वाचलं, युट्युबवरचे युद्धानंतरच्या ऍनॅलिसिसचे काही व्हिडियोज पाहिले.

Plan_Operatie_Market_Garden

नकाशा मध्ये मोहिमेप्रमाणे कोणकोणते पूल सर करण्यात येणार होते ते दिसतंय. A/B Div. याचा अर्थ Airborne Division म्हणजे हवाईदलाची तुकडी . (स्रोत: विकिमिडीया कॉमन्स )

त्या युद्धाबद्दल इंटरनेटवर बऱ्यापैकी वाचायला मिळतंच. पण थोडक्यात त्याबद्दल सांगते. १९४४ मध्ये सगळेच जण युद्धाला कंटाळले होते. थकले होते. दुसरं महायुद्ध काही केल्या संपत नव्हतं. ते संपवण्याकरता फिल्ड मार्शल मॉंटगोमरीने एक फार महत्वाची मोहीम आखली. नॉर्मंडीच्या युद्धानंतरची ही अत्यंत महत्वाकांक्षी मोहीम होती जी यशस्वी झाली तर महायुद्ध संपेल आणि मित्र राष्ट्रांचा(म्हणजे इंग्लंड, यु. एस., फ्रान्स)विजय होईल असा मॉंटगोमरीचा दावा होता. मोहिमेचं नाव होतं ‘ऑपरेशन मार्केटगार्डन’. नॉर्मंडीच्या विजयानंतर मित्र राष्ट्रांनी नेदर्लंडकडे कूच केली. मॉंटगोमरीच्या मोहिमेप्रमाणे एन्डोव्हन(Eindoven) मधले पूल, नायमेगेन(Nijmegen) आणि आर्नहेम(Arnhem) मधल्या पूलांवर ताबा मिळाला आणि तिथून ऱ्हाईन नदी ओलांडता आली तर जर्मनीच्या पश्चिमेला असलेल्या रूर(Ruhr) या औद्योगिक दृष्ट्या सुधारलेल्या प्रातांत शिरून हल्ले करता येतील आणि जर्मनीला शरणागती पत्करावी लागेल. मोहिमेप्रमाणे पार उत्तरेकडच्या आर्नहेमच्या पुलावर ब्रिटिश हवाई दलाची तुकडी उतरणार होती आणि खाली दक्षिणेत एन्डोव्हनमध्ये लष्कराची तुकडी हल्ला करून तिथले ९ पूल २-३ दिवसात सर करून आर्नहेम पर्यंत पोहोचेल आणि तिथे आधीच उतरलेल्या पॅराट्रूपर्स आणि हवाई दलाच्या तुकडीला रिलीव्ह करेल असा प्लॅन होता. पण आर्नहेमच्या पुलावर ब्रिटिश हवाई दल उतरता क्षणीच तिथल्या जर्मन तुकडी कडून जोरदार प्रतिकार झाला. नायमेगेनच्या पूलापर्यंत पोहोचायला तिथल्या तुकडीला उशीर झाला आणि तोपर्यंत तिथल्या जर्मन सैन्याने तिथला पूल उद्ध्वस्त केला. दक्षिणेकडून येणारी सैन्याची तुकडी आर्नहेममध्ये उतरलेल्या ब्रिटिश हवाई दलाला मदत करायला २-३ दिवसात पोहोचुच शकली नाही. इतक्या लांबच्या अंतरावर(६० मैल किंवा ९७ किमी) सैन्याकडचे रेडिओ सेट्स काम करेनासे झाले आणि शेवटी आर्नहेममध्ये मित्र राष्ट्रांच्या फार मोठा पराजय झाला. महायुध्दाच्या इतिहासातला मित्र राष्ट्रांचा हा सगळ्यात मोठा पराभव होता असं म्हणतात. या पराजयाची अनेक कारणं आहेत असं म्हणतात- मुळात ही मोहीम अति महत्वाकांक्षी होती. पॅटन आणि मॉंटगोमरी हे दोघेही मित्र राष्ट्रांचेच मोठे अधिकारी असले तरी त्यांच्यात इगो प्रॉब्लेम होता. त्या चढाओढीतून ही मोहीम आखली गेली असं म्हटलं जातं. मोहीम अंमलात आणण्यापूर्वी काही अधिकाऱ्यांनी- ही मोहीम यशस्वी होणार नाही- असं सांगून सुद्धा ती राबवली गेली ती सुद्धा याच कारणामुळे असं म्हटलं जातं. ही मोहीम यशस्वी झाली असती तर दुसरं महायुद्ध एक वर्ष आधीच संपलं असतं. कदाचित नंतर जर्मनीचे- पूर्व आणि पश्चिम जर्मनी- असे दोन भाग जे झाले ते झाले नसते. शीतयुद्ध कदाचित टळलं ही असतं. असो- सगळ्या जर तरच्या गोष्टी! हे ऑपरेशन घडलं १७-२५ सप्टेंबर १९४४ या काळात. त्यामुळे येत्या आठवड्यात या लढाईला बरोब्बर ७४ वर्षं पूर्ण होतायत. महायुद्ध म्हणजे फक्त हिटलर, मित्र राष्ट्र आणि नंतर जपान मध्ये झालेला अणुबॉम्ब हल्ला आणि मग झालेला मित्र राष्ट्रांचा विजय- एवढं ढोबळ नव्हतं. किंवा जर्मनी-नाझी यांनी केलेले अत्याचार आणि नंतर मित्र राष्ट्रांची(म्हणजे चांगल्यांची) झालेली जीत इतकं साधं-सोपं ही नव्हतं. प्रत्येक छोट्या-मोठ्या लढाईमध्ये कितीतरी लोकांचं व्यवस्थापन कौशल्य पणाला लागलं होतं. शेवटी मित्र राष्ट्र जिंकली असली तरी सुद्धा मित्र राष्ट्रांचे कित्येक निर्णय पूर्णपणे चुकले होते. काही वेळा आधीच्या विजयी मोहिमेमुळे तयार झालेला त्यांचा अति आत्मविश्वास त्यांना नडला होता. मोठ्या-मोठ्या अधिकाऱ्यांचे एकमेकांशी असलेले संबंध, त्यांच्यातले इगो प्रॉब्लेम्स, सैनिकांचे एकमेकांमधले हेवेदावे किंवा मैत्रीचे संबंध, सगळे मित्र राष्ट्रांमधलेच असले तरी वेगवेगळ्या देशांच्या सैनिक/अधिकाऱ्यांचे एकमेकांशी असलेले संबंध, त्यांच्यातले मतभेद …कितीतरी भावभावना आणि कॉम्प्लिकेशन्स. ही मोहीम आखताना ही या सर्व गोष्टींचा प्रभाव त्यावर पडणारच होता.

hdr

मेमोरियलपाशी उभं राहून काढलेला आत्ताच्या पूलाचा फोटो!

आर्नहेम या युद्धात बऱ्याच प्रमाणात बेचिराख झालं. आत्ताचं आर्नहेम बरंच नवं पण जुन्या खुणा जपून पुढे जाणारं गाव आहे. टिपिकल डच गावाच्या खुणा रेल्वे स्टेशनवर उतरल्या उतरल्या पहायला मिळतात. रेल्वे स्टेशन नवं अद्ययावत आहे! बाहेर पडल्यावर दिसणारे एवढे वेगवेगळे रंग आमच्यासारख्या जर्मनीतून गेलेल्या माणसांचं लक्ष वेधून घेत होते. प्रत्येक लॅंपपोस्टवर गुलाबी आणि जांभळ्या रंगाच्या फुलांचे वेल चढवले होते. बऱ्याच जुन्या, काही नव्या इमारती गेरू सारख्या रंगाने रंगवलेल्या! एवढे वेगवेगळे रंग शेजारी चिकटून असलेल्या जर्मनीच्या रस्त्यांवर पाहायला मिळणं दुर्मिळ. गुलाबी वगैरे रंग तर जर्मन्सना माहीतच नसावेत बहुदा- जर्मन्सचं प्रेम राखाडी-काळपट रंगावर! संपूर्ण गाव बहुदा प्लॅनिंग करुन रंगवलंय असं वाटत होतं. बरोबर आर्किटेक्ट-चित्रकार मित्र असल्याने facade, गावाची colour palette असे वेगवेगळे concept आणि terminologies सुद्धा मला कळत होत्या. पायी-पायी गाव पूर्ण फिरलो आणि दुसऱ्या टोकाला असलेल्या या प्रसिद्ध पूलापाशी पोहोचलो. महायुद्धाच्या वेळी जो पूल होता अर्थातच तो आता नाही. तसाच नवा पूल तिथे बांधलाय. या पुलाला जॉन फ्रॉस्टचं नाव आता देण्यात आलंय. हा फ्रॉस्ट आर्नहेमच्या पुलाजवळ उतरलेल्या ब्रिटिश हवाई दलाच्या तुकडीचा प्रमुख होता. हा पूल जरी तसाच्या तसा बांधला गेलेला असला तरी त्या पूलाच्या आजूबाजूचा भाग आणि आर्नहेम गाव १९७०च्या दशकात इतकं बदललं की १९७७च्या ‘A Bridge Too Far’ च्या चित्रीकरणाच्या वेळी इथे चित्रीकरण करता आलं नाही. त्या ऐवजी अटेनबरोने Deventer या गावात असलेल्या तशाच प्रकारच्या पुलावर चित्रीकरण केलं. आज या आर्नहेमच्या पूलाजवळ एक मेमोरियल उभं आहे. तिथे त्यावेळी वापरली गेलेली शस्त्र पहायला मिळतात. त्याचबरोबर त्या युद्धाचं वर्णन करणारी एक छोटीशी फिल्म पहायला मिळते. या फिल्म मध्ये इंग्लिश सैनिक, जर्मन सैनिक आणि डच सिव्हिलियन यांचा त्याबद्दलचा दृष्टिकोन ऐकायला मिळतो. त्यात जर्मन सैनिक एक फार महत्वाचं वाक्य बोलला आहे. तो म्हणतो- We won the battle. But actually in a battle no one wins. Everyone is a loser in any battle.

hdr

युद्धानंतर दुसऱ्यादिवशी काढलेलं पूलाचं चित्र. सगळं काही बेचिराख झाल्याचं दिसत आहेच! चित्र थोडं zoom करून पाहिल्यास अधिक स्पष्ट दिसेल.

 

नंतर आम्ही त्या पुलावरून पलीकडच्या बाजूलाही गेलो. जेमतेम ७०-७५ वर्षांपूर्वी मी उभी आहे त्या ठिकाणी इतकं भयानक युद्ध झालं होतं हे फीलिंग फार ओव्हरव्हेलमींग होतं. आज त्याच पुलावरून गाड्या शांतपणे नदी पार करत होत्या. पुलाखालून ऱ्हाईन नदी संथपणे वहात होती. पुलाच्या पलीकडच्या बाजूला, नदी किनारी कुठलंसं म्युझिक फेस्टिव्हल होतं. जणू काही काहीच घडलं नाही! मघाशी पुलाजवळच्या मेमोरियल मध्ये आम्हाला एक चित्र दृष्टीस पडलं होतं. इथे झालेल्या लढाईनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी त्या पुलाचं काढलेलं ते चित्र.  त्या चित्रपटाच्या शेवटीसुद्धा आपल्याला दिसतो तो उध्वस्त झालेला पूल, कितीतरी सैनिकांचे, सामान्य माणसांचे मृतदेह, बेचिराख झालेली आजुबाजुची घरं, सुदैवाने वाचलेले पण झालेली वाताहात विषण्णपणे आणि असहायपणे पाहणारे सामान्य नागरिक! जेमतेम ७०-७५ वर्षं, पण कितीतरी खोलवरच्या जखमा काळाने भरून काढल्या नाही का!?

 

hdr

आर्नहेममधलं सगळ्यात मोठं चर्च. १५व्या शतकात बांधलं गेलं होतं पण १९४४च्या लढाईत याची सुद्धा बरीच पडझड झाली होती. त्यानंतर ते परत बांधलं गेलं.

hdr

आर्नहेमचं सुसज्ज सेंट्रल रेल्वे स्टेशन

 

 

 

Advertisements

4 thoughts on “आर्नहेम-बरोबर ७४ वर्षांपूर्वी!

 1. Bhagyashree Nikumbh says:

  Mala World war 1 & 2 madhe ajibat interest Nahi ahe.. pn hya post mule war madhli Kahi mahiti mala milali ani ajun mahiti milavavi ashi utsukata vadhali ahe.. ajun Ase posts lihi… Mhanje mala war baddal ajun kuthe vachaychi garaj Nahi.. 😜

  Liked by 1 person

 2. Sharvey Salkar says:

  Farch sundar! Agdi mala to diwas ani gappa athavlya! Mazya navacha ullekh kelya baddal , ani architectural drushtya zalelya charche ne kantalali nahis he vachun chan vatla!
  Excited to read your perception of ruhr and werden!

  Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s