ड्युसलडॉर्फ डायरीज्

नोकरीसाठी नुकतीच मी डार्मश्टाटहून ड्युसलडॉर्फला आल्ये. ३ वर्ष डार्मश्टाटमध्ये होते. युनिव्हर्सिटी, विद्यार्थी आणि ESA-ESOC, Merck या तीन-चार गोष्टींसाठी प्रसिद्ध असलेलं ते शहर! पण तीन वर्षं तिथे राहिल्यानंतर ते शहर सोडणं माझ्या खरोखर फार जीवावर आलं होतं. तीन वर्षांत त्या शहराशी माझं connection जुळलं होतंच ना!
ड्युसलडॉर्फमध्ये प्रवेश करता क्षणी डार्मश्टाटच्या तुलनेत हे बरंच मोठं शहर आहे हे लक्षात आलं! शहरामधुन वाहणारी ऱ्हाईन नदी, नदीच्या काठाने असलेले पार्क्स, मेट्रोजचं उत्तम नेटवर्क, भला मोठा सिटी-सेंटरचा भाग, गर्दी आणि रहदारीने बऱ्यापैकी भरलेले रस्ते, ठिकठिकाणी दिसणारी ऐतिहासिक संदर्भ असलेली ठिकाणं, आर्ट गॅलरीज, म्युझियम्स, भली मोठी जुनी चर्चेस, आणि हे सगळं अनुभवायला आलेले असंख्य टूरिस्ट्स! डार्मश्टाटमध्ये आजुबाजुला दिसणाऱ्या माणसांपैकी बरेचसे विद्यार्थी आणि नोकरी करणारी मंडळी काही प्रमाणात असायची. इथे सर्व स्तरातली असंख्य लोकं आजुबाजुला दिसतात. शहर मोठं झालं की बकालपणा वाढतो हे जरी खरं असलं(हो! हे भारताप्रमाणेच युरोपलाही लागु होतं! पॅरिस, बर्लिन, फ्रॅन्कफुर्ट, कलोन, म्युनिक, व्हेनिस सारख्या शहरांचे काही भाग अत्यंत बकाल आहेत!), तरीसुद्धा मोठ्या शहराचे असंख्य फायदेही असतातच. पुण्या-मुंबई सारखी शहरं जशी हॅपनिंग, रोज नवं काही ऑफर करणारी आणि कधीही जुनी न होणारी आहेत तसंच हे ड्युसलडॉर्फसुद्धा फार इंटरेस्टिंग आहे असं मला वाटायला लागलंय.
सुदैवाने मी इथे एका जर्मन बाईबरोबर रहात आहे. ती सुद्धा गेली ८-१० वर्षं ड्युसलडॉर्फ मध्ये राहात आहे. त्यामुळे तिच्याकडून बऱ्यापैकी गोष्टी मला समजत असतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही की माझ्या कंपनीने मला पहिले दोन आठवडे एका जर्मन क्लासमध्ये भाषेची प्रॅक्टिस होण्याकरता पाठवलं. त्यामुळे तिथली शिक्षक मंडळी, तिथे वेगवेगळ्या देशातून आलेले विद्यार्थी आणि त्यांच्या बरोबरीने आणि त्यांच्या नजरेतून थोडंफार ड्युसलडॉर्फ उलगडणं, समजून घेणं हा फार जगावेगळा अनुभव मला या पंधरा दिवसात घेता आला!
जर्मन क्लासमध्ये असंख्य प्रकारची वेगवेगळ्या देशातली आणि वेगवेगळ्या उद्देशाने आलेली माणसं होती. रोमेनिया, इटली, चायना, जपान, साऊथ कोरिया, नेदरलँड, काजखस्तान, स्पेन, पेरू, रशिया, टर्की, पोर्तुगाल अशी वेगवेगळ्या देशातुन आलेली मंडळी! कोणाला इंटरप्रिटर व्हायचंय म्हणून, कोणी नोकरी मिळावी म्हणून, कोणी नोकरी असून सुद्धा जर्मन सुधारायचं म्हणून, कोणी शिक्षणाकरता जर्मन सुधारायचं म्हणून, तर काही जण चक्क टूरिस्ट म्हणून आले होते- दोन-तीन आठवडे ड्युसलडॉर्फमध्ये रहायचं-सकाळी काही वेळ जर्मन क्लास करायचा-जगभरातून तिथे आलेल्या लोकांशी मैत्री करायची, त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं-आणि नंतर दिवसभर शहर एक्स्प्लोर करत हिंडायचं!! ट्रीपची एक वेगळीच कल्पना!! क्लासमध्ये एक नियम- कोणीही कोणालाही ‘अहो-जाहो’ करायचं नाही!! अगदी शिक्षकांना सुद्धा नाही! त्यामुळे वय, हुद्दा, शिक्षण सगळं विसरून सगळे एकमेकांचे मित्र झाले होते. आपापल्या देशातील राजकारण, समाजकारण, लग्नसंस्था,अर्थकारण, अशा असंख्य गोष्टींबद्दल जर्मन मधून चर्चा रंगायच्या क्लासमध्ये. मला शिकवणारे दोन्हीही शिक्षक मुळचे ड्युसलडॉर्फचे! त्यामुळे इथली वेगवेगळी ठिकाणं, खाण्या-पिण्याचे स्पॉट्स, त्यांच्या या शहरातल्या लहानपणच्या आठवणी याबद्दल ते दोघं भरभरून बोलत. आमच्या शिक्षिकेची एक मैत्रीण लेखिका आहे. तिने ड्युसलडॉर्फ मधली वेगवेगळी ठिकाणं, इथले रस्ते, त्यांचा इतिहास, त्या-त्या ठिकाणी घडलेले वेगवेगळे प्रसंग यावर छोटं पुस्तक लिहिलंय. ते तिने आम्हाला दाखवलं होतं. ते पाहिल्यावर मला अरुण टिकेकरांचं ‘स्थलकाल’ पुस्तक आठवलं. ‘स्थलकाल’चा आवाका जरा मोठा आहे इतकंच! माझ्या क्लासच्या शेवटच्या दिवशी आम्ही सगळी मंडळी ड्युसलडॉर्फ शहराचा जुना भाग पहायला गेलो होतो. गंमत म्हणजे प्रत्येकाला एकेका ठिकाणाचा अभ्यास आधी करून तिथे गेल्यावर इतरांना जर्मन मध्ये त्या ठिकाणाबद्दल सांगायचं काम शिक्षिकेने दिलं होतं. तिचं लहानपण याच गावात गेल्यामुळे मग ती सुद्धा तिथल्या आठवणी सांगत होती.
St. Lamburtus Church हा या शहराचा सुरुवातीचा बिंदू असं म्हणता येईल. या चर्चला ‘मदर चर्च’ सुद्धा म्हणतात, कारण ड्युसलडॉर्फ मध्ये बांधलं गेलेलं हे पहिलं चर्च आहे. १२०६ मध्ये या ठिकाणी अगदी छोटं चॅपल बांधलं होतं. त्या वेळी ड्युसलडॉर्फ असं ठिकाण सुद्धा अस्तित्वात नव्हतं!! ड्युसल नावाची एक अगदी छोटी ऱ्हाईन नदीची उपनदी इथे आहे. या ड्युसलच्या किनारी एक छोटं खेडं होतं. त्यानंतर वोरिंगेनची एक मोठी लढाई झाली. त्या लढाईत Count Adolf V of Bergने Archbishop of  Cologne, Siegfried of Westerberg वर विजय मिळावला म्हणे आणि १४ ऑगस्ट १२८८ ला एक गाव म्हणून ओळख मिळाली म्हणे! त्यानंतर हे चर्च आणि ड्युसलडॉर्फ बरंच वाढलं. आत्ता दिसणारं चर्च हे १३९४ मध्ये बांधून झालंय म्हणे! आता ही सगळी माहिती गुगलवर मिळते सहज आणि त्याठिकाणीसुद्धा वाचायला मिळते. थोड्याच वेळात ही सगळी नावंसुद्धा विसरून जातो आपण! पण ही सनावळी वाचून सहज मला आठवलं- १३व्या-१४व्या शतकात आपल्याकडे भारतामध्ये-विशेषतः महाराष्ट्राच्या भागात त्या सुमारास यादव राजघराणं राज्य करीत होते-म्हणजे आपल्याकडची हेमाडपंती मंदिरं याच काळात साधारण बांधली गेल्येत! आपले संत ज्ञानेश्वर किंवा चक्रधर स्वामी अगदी याच काळातले!
sdr

St. Lamburtus Churchचा टॉवर. नीट पाहिलं तर लक्षात येतं की तो थोडा ट्विस्टेड आहे! तो तसं बांधण्यामागचं कारण काही अजुन मला कळलं नाहीये. पूर्वीच्या काळी वीज पडून आग लागायचं प्रमाण जास्त होतं. त्याचं स्ट्रक्चर आणि तो बांधायला वापरलेली सामग्री याचा त्या आगीशी काही संबंध असावा! पण हा टॉवर बऱ्यापैकी उंच आहे आणि तो दूरवरून सतत दिसत राहतो.

हे चर्च त्याच्या दिसण्यावरून कॅथॉलिक चर्च आहे हे लगेचच कळतंच. प्रोटेस्टंट पंथ १६व्या शतकात उदयास आला. हे त्या आधीचं आहे त्यामुळे हे चर्च १०० टक्के कॅथॉलिकच असणार हे अपेक्षित होतं. हल्ली जर्मनीमध्ये चर्चला फारसं कोणी मानत नाही. चर्चमध्ये जाण्याचं बऱ्याच मंडळींनी केव्हाच सोडलं आहे. आमच्या शिक्षिकेशी बोलता बोलता हे जाणवलंच पण सहज जाता जाता ती कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट चर्चच्या विचारसरणीतला, दिसण्यातला फरक सुद्धा सांगून गेली!
dav

१४ ऑगस्ट १९८८ रोजी ड्युसलडॉर्फ शहराचा ७००वा वाढदिवस होता, त्यानिमित्त हे स्मारक बांधलं गेलं. यात वोरिंगेनची लढाई, मग ड्युसलडॉर्फला गाव म्हणून मिळालेली मान्यता आणि नंतर भरभराट झालेलं ड्युसलडॉर्फ ही दिसतं. पण एखाद्या गावाचा किंवा शहराचा वाढदिवस ही कसली भारी गोष्ट आहे नाही का?

ड्युसलडॉर्फमध्ये आल्यावर आपल्याला सहज आणि सतत दृष्टीस पडणाऱ्या दोन गोष्टी आहेत! त्यातली पहिली म्हणजे आपल्याला सतत Heinrich Heine(हाइनरिश हाईनS) हे नाव कुठे ना कुठेतरी लिहिलेलं दिसतं. हा हाइनरिश हाईनS फार मोठा लेखक, पत्रकार आणि कवी होता(पुर्वी लिहिलेल्या जर्मन नद्यांवरच्या लेखात त्याने लिहिलेल्या एका कवितेचा मी उल्लेख केला होता!). ड्युसलडॉर्फमध्ये त्याचा जन्म झाल्यामुळे त्याला ‘ड्युसलडॉर्फचा सुपुत्र’ असं म्हणलं जातं. हा आधी ज्यु होता आणि त्याचं नाव हॅरी हाईनS होतं. पण करियरच्या प्रगतीच्या आड धर्म येईल असं वाटून त्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि नाव हाईनरिश करून घेतलं म्हणे! ड्युसलडॉर्फ मध्ये त्याची दोन घरं आहेत. एक- जिथे त्याचा जन्म झाला आणि तो वाढला ते आणि दुसरं त्याच्या काकांचं घर- जिथे त्याला भरपूर पुस्तक वाचायला, लिहायला, विचार करायला वेळ आणि शांतता मिळायची ते! हा हाईनS ज्या शाळेत शिकला त्याच शाळेत आमची शिक्षिकासुद्धा शिकल्ये आणि त्याचा तिला केवढा अभिमान होता! हाईनS बद्दल तिच्याशी बोलताना सतत ते जाणवायचं!

ड्युसलडॉर्फमध्ये सतत दिसणारी दुसरी गोष्ट म्हणजे cartwheel करणाऱ्या मुलांची चित्र किंवा पुतळे. या cartwheel  करणाऱ्या मुलांना इथे Radschläger(राडश्लेगर) म्हणतात. या शहरात चक्क समारंभांना लहान मुलांनी cartwheel करण्याची जुनी परंपरा आहे! ही प्रथा कशी पडली ते काही कोणाला फारसं माहीत नाही- पण, ते १२८८ मध्ये वोरिंगेनचं युद्ध जिंकल्यावर इथल्या लहान मुलांनी म्हणे cartwheel  घालून आनंद व्यक्त केला होता असं कोणी म्हणतं तर कुठल्याश्या राजघराण्याच्या लग्नाच्या मिरवणुकीत मुलांनी cartwheel करून नव्या वधूला हसवलं होतं असंही लोक म्हणतात. १९-२०व्या शतकात शहरात येणाऱ्या प्रवाश्यांची लहान मुलांनी cartwheel घालून दाखवून करमणूक केली म्हणजे ही मंडळी त्यांच्या हातावर थोडे पैसे टेकवायची. म्हणूनही ही परंपरा चालू राहिली असं काही लोक म्हणत. पण ड्युसलडॉर्फ मधल्या जवळजवळ प्रत्येक लहान मुलाला आणि मुलीला cartwheel घालता येते असा आमच्या शिक्षिकेचा दावा होता. लहानपणी शहरात होणाऱ्या वेगवेगळ्या समारंभांना-प्रदर्शनांच्या उद्घाटनांना तिने सुद्धा cartwheels केल्याचं तिला आठवतंय!
dav

जुन्या ड्युसलडॉर्फ मध्ये Burgplatz नावाचं एक ठिकाण आहे. तिथे हे cartwheeler मुलांचं कारंजं आहे. त्यावर खाली जुन्या बोलीभाषेत हे लिहिलंय-“Radschläger wolle mer blieve, wie jeck et de Minschen och drieve”-  म्हणजे – “We want to keep being cartwheelers, no matter how crazy the world might be”.

आत्तापर्यंत अनेकांना प्रश्न पडला असेलच की मी युरोपमधल्या आणि त्यात सुद्धा जर्मनीतल्या एका शहराबद्दल बोलत्ये आणि अजुन बियरचा कुठे उल्लेख सुद्धा कसा नाही?!! तर!! ड्युसलडॉर्फ मध्ये तीन अत्यंत महत्वाच्या breweries आहेत. Füchschen, Schumacher आणि Uerige! त्यात Uerige ची गोष्ट विशेष गंमतीशीर आहे. Uerige हा इथल्या बोलीभाषेतला जुना शब्द आहे. या शब्दाचा अर्थ Grumpy किंवा सदैव वैतागलेला, चिडचिड करणारा असा होतो. १८६२ मध्ये ही brewery सुरु करणारा Wilhelm Cürten हा स्वतः Uerige होता. तो म्हणे सदैव घरात बसलेला असायचा, रविवारी फक्त चर्च मध्ये जाण्यासाठी बाहेर पडायचा! दुसऱ्या महायुद्धात ही brewery संपूर्ण बेचिराख झाली म्हणे. पण युद्धानंतर त्याच्या त्यावेळच्या मालकाने पुन्हा ती सुरु केली. गंमत म्हणजे इथले waitersसुद्धा service देताना सदैव आपल्यावर वैतागलेले आणि चिडलेले असतात. ही पद्धतच आहे म्हणे या breweryची!
sdr

सकाळी-सकाळी Uerigeच्या बाहेर काढलेला फोटो आहे. दुपारपासून हे ठिकाण खचाखच भरलेलं असतं. बसायला जागा शोधावी लागते!

sdr

Uerige मधले बीयरचे कोस्टर्स: ‘चांगलं खा-प्या आणि राजकारणाच्या बाबतीत आपलं तोंड बंद ठेवा!’ : अगदी जर्मन रोखठोकपणाने पुरेपूर भरलेलं वाक्य आहे!

ड्युसलडॉर्फ मध्ये Killepitsch(किलिपीच) नावाचं अजुन एक मद्य मिळतं. याची पण एक गमतीशीर गोष्ट आहे. हे मद्य जर ते विकणाऱ्या Et Kabuffke(एट काबुफ्कS) नावाच्या दुकानात जाऊन shots म्हणून प्यायलं तर ते अजुन उत्तम लागतं असा इथल्या लोकांचा दावा आहे. या किलिपीच मध्ये तब्ब्ल ४२% अल्कोहोल असतं. जगभरातल्या वेगवेगळ्या वनस्पतींपासून बनवलेलं हे मद्य आहे म्हणे! दुसऱ्या महायुद्धानंतर हे किलिपीच बनवलं गेलंय. दुसऱ्या महायुद्धात जर्मनी मध्ये प्रचंड बॉम्बहल्ले होत होते. त्यावेळेला दोन मित्र ड्युसलडॉर्फमध्ये एका बंकर खाली लपून बसले होते. त्यातला एक ब्रेवर असणारा मित्र दुसऱ्याशी इथल्या बोलीभाषेत म्हणाला- आपण जर या युद्धात मारले गेलो नाही तर त्याचा आनंद साजरा करायला मी एक पेय तयार करेन- the brewer said if they avoided being ‘killed’, he’d make a drink (‘pitsch’) to celebrate it. आणि महायुद्धानंतर तो किलिपीच(Killepitsch) विकू लागला. या पेयातले घटक पदार्थ आणि प्रमाण नक्की काय आहेत हे अजुनही ते विकणाऱ्या कुटुंबाने उघड केलेलं नाहीये म्हणे! ड्युसलडॉर्फमध्ये हे पेय प्रचंड प्रसिद्ध आहे. ते Et Kabuffke दुकान खरंतर एखाद्या खोक्याला खिडकी करावी तसं बाहेरून दिसतं. त्या खिडकीतून लोकं आतल्या माणसाला पेयाची ऑर्डर देतात. आमची शिक्षिका म्हणली की जर मी या पेयांचे एका ऐवजी २ shots प्यायले तर सायकलवरून परत घरी जाताना माझी सायकल वेडीवाकडी व्हायला लागते-इतकं अल्कोहोल आहे त्यात!
dav

Et Kabuffke: बाहेरून

 

dav

Et Kabuffke: आतुन

dig

जुन्या ड्युसलडॉर्फमध्ये ही अशी जुनी घरं अजुनही आहेत. अरुंद आणि आत लांबच्या-लांब ही अशी घरं नेदरलँडमध्ये ही काही ठिकाणी दिसतात असं ऐकलंय! त्याच्या डाव्या बाजुला अनेक घंटा टांगलेली इमारत दिसत्ये त्याला Glockenspiel म्हणतात.

ड्युसलडॉर्फ मध्ये एक मोठी कला अकादमी आहे. K20 आणि K21 नावाची कला दालनं आहेत. त्यात अनुक्रमे विसाव्या आणि एकविसाव्या शतकातल्या कलाकारांची प्रदर्शनं होत असतात. त्यातला K चा अर्थ Kunst(कुन्स्ट) म्हणजे ‘कला’ असा होतो. त्याच्या आजुबाजुला अनेक छोटी छोटी आर्ट शॉप्स आहेत. आमच्या शिक्षिकेच्या आठवणीत तर फक्त कलाकारांकरता राखीव असलेलं एक कॅफे सुद्धा आहे. तिथे अनेक चित्रकार मंडळी जाऊन स्केचेस काढत बसत. दुर्दैवाने ते बंद झालं.
वेगवेगळ्या देशातून आलेल्या मंडळींबरोबर, त्यांच्या देशातल्या वेगवेगळ्या गोष्टी ऐकत आणि ड्युसलडॉर्फ मधल्याच शिक्षिकेबरोबर, तिच्याकडून तिच्या लहानपणच्या अनेक गोष्टी ऐकत ड्युसलडॉर्फ पाहणं हा वेगळाच अनुभव होता. साधारण युरोपातली बरीचशी शहरं फोटोमधून बऱ्यापैकी सारखी दिसतात. शहराच्या जुन्या भागात गेलं की कॉबल्ड स्ट्रीट्स, गॉथिक किंवा बरोक स्टाईलची चर्चेस किंवा कॅथेड्रल्स, आर्चेस, बाहेर खुर्च्या मांडलेली नेटकी, सुंदर कॅफेज, किंवा एखादं भव्य पॅलेस/राजवाडा हेच टिपिकल चित्र असतं असं माझ्या भारतीय मित्रमंडळींचं बऱ्याचवेळेला म्हणणं असतं. पण फोटो किंवा चित्रामधून किंवा व्हिडीओ मधून शहर किंवा एखादं ठिकाण पहाणं आणि त्या ठिकाणाला जज करणं हे किती लिमिटेड परसेप्शन आहे असं मला हल्ली वाटायला लागलंय. म्हणजे एखादं ठिकाण आपण प्रत्यक्ष जाऊन पहातो तेव्हा फक्त ते डोळ्यांनी आपण पहात नाही. त्यावेळेला तिथे असणारे गंध, तिथलं वातावरण, तिथली आजूबाजूची माणसं, आपल्या बरोबर असणारी माणसं, ते ठिकाण पहाताना आपल्या बरोबरच्या माणसांशी झालेला संवाद, एवढंच काय- आपण त्या ठिकाणी कसा प्रवास करुन पोहोचलो या सर्व गोष्टींची आपल्या मनावर इम्प्रेशन्स होत असतात. म्हणजे मी जर्मन क्लास मधल्या लोकांबरोबर ड्युसलडॉर्फ मधली ठिकाणं पाहिली-जर त्या ऐवजी मी माझं-माझं गूगलवर माहिती शोधून हिंडले असते तर माझ्या मनावर वेगळी इम्प्रेशन्स तयार झाली असती. भारतीय मित्र-मैत्रिणींबरोबर टूरिस्ट म्हणून ड्युसलडॉर्फ पाहिलं असतं तर वेगळंच ड्युसलडॉर्फ मला दिसलं असतं कदाचित! किंवा मी पुन्हा एकदा ही ठिकाणं पाहीन तेव्हा वेगळी इम्प्रेशन्स तयार होतील कदाचित! पण या शहराचं हे तयार झालेलं हे पहिलं इम्प्रेशन फार विशेष आणि वेगळं आहे हे नक्की!
ड्युसलडॉर्फ मध्ये आहे तोपर्यंत हे शहर एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा इथल्या ठिकाणांबद्दल आणि अशा इम्प्रेशन्सबद्दल, वेगळ्या अनुभवांबद्दल परत पुढच्या भागात लिहीनच…!
Advertisements

4 thoughts on “ड्युसलडॉर्फ डायरीज्

  1. aroundindiaghansham says:

    खुप छान वर्णन. नेहमीच आपल लिखाण ओवघत्या शैलीत नवनविन वैविध्यूपुर्ण माहिती देणारे असतं.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s