बन बन आज फूली बसंत बहार!

गेल्या आठवड्यात नेदरलँडच्या ट्युलिप गार्डन्सच्या लीस गावात दरवर्षी होणारी फ्लॉवर परेड पार पडली. अनेक मित्रमैत्रणींनी फोटो टाकले होते आणि मला आमची गेल्या वर्षीची ट्रिप आठवली. Keukenhof Tulip Gardens या दरवर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चालू असतात. ‘सिलसिला ‘ आणि अजुन काही बॉलीवूड चित्रपटातून आपल्यासारख्या भारतीयांना त्यांची तोंडओळख झालेलीच असते. त्यामुळे या दरम्यान भारतीय पब्लिक भरपूर असतं तिथे. ट्युलिप्स बरोबरच डॅफोडिल्स, हायसिन्थ आणि काही प्रमाणात गुलाब या झाडांचीही त्या गार्डनमध्ये लागवड केलेली आहे. पण ट्युलिप्स जास्त प्रमाणात आहेत. वेगवेगळ्या रंगसंगती, फुलं यांचा फार चांगला वापर करून लागवड केलेली असल्याने डोळ्यांना ते अजुनच सुखद वाटतं. त्याच बरोबर गार्डन मधल्या वेगवेगळ्या हॉल्स मध्ये काही छोटी छोटी फुलांशी निगडीतच प्रदर्शनं असतात. एप्रिलच्या साधारण शेवटच्या वीकेंडला म्हणजे जेव्हा सगळी फुलं ऐन बहरात असतात तेव्हा ट्युलिप गार्डन असलेल्या लीस गावातुन फ्लॉवर परेड जाते. ती पहायला अनेक लोकं गोळा होतात. पण या परिसरात साधारणपणे या दिवशी फार गर्दी असते. त्यात पुन्हा लोक फुलं पहायच्या ऐवजी सेल्फीज घेण्यात गुंग असतात आणि गर्दी अडवत असतात(बारीक डोळेवाले चिनी आणि कोरियन यात अग्रेसर असतात अगदी!! आणि त्यांच्या जोडीला आपलं देसी पब्लिक असतंच भरभरून! 😉 ). त्यामुळे पुरेसा वेळ असेल तर ट्युलिप गार्डन आणि फ्लॉवर परेड पाहून झाल्यावर, गार्डनच्या बाहेर सायकल्स भाड्याने मिळतात, त्या घेऊन सरळ लीस गावात चांगला ३-४ तास फेरफटका मारावा या मताची मी आहे(तेवढीच, या झुंबड गर्दीपासुन काही वेळ सुटका! ;P ). लांबच्या-लांब पसरलेले ट्युलिपचे मळे, वातावरणात भरून राहिलेला गोडसर वास, सुंदर, नेटके रस्ते…-डोळ्यांची पारणं फिटतात अगदी! तुम्हाला अगदी ट्युलिपच्या मळ्यात जाऊन सगळ्याचा आनंद घेता येतो! अक्षरशः वेगवेगळ्या रंगाचे गालिचे जमिनीवर पसरावेत तसं दिसत असतं ते!

20170422_091205

नेदरलँड ट्युलिप गार्डन्स . २०१७ चा वसंत ऋतू !

IMG_20170422_134420

लीस गावातल्या ट्युलिपच्या मळ्यात आमच्या सायकल्स. २०१७ चा वसंत ऋतू !

20170422_143353

लीस गावातला ट्युलिपचा मळा. २०१७ चा वसंत ऋतू !

IMG_20170422_133510

लीस गावातला ट्यूलिपचा मळा. २०१७चा वसंत ऋतू!

20170422_083132

नेदरलँड ट्युलिप गार्डन्स . २०१७ चा वसंत ऋतू !

युरोपात साधारण मार्च संपत आलेला असताना हळुहळु वातावरण उष्ण व्हायला लागतं. छान उन्हं पडायला लागतात. हिवाळ्यात सर्व झाडांच्या अक्षरशः काठ्या झालेल्या असतात. पाऊस- बर्फाने वातावरण मलूल झालेलं असतं. मार्चच्या शेवटी डे-लाईट-सेविंग सुरु होतं आणि दिवससुद्धा मोठा होऊ लागतो. वसंत ऋतू पृथ्वीवर अवतरतो! मग ट्युलिप, डॅफोडिल्स, हायसिन्थ प्रमाणेच ब्लु बेल्स, लिलीज, गुलाब सारखी फुलं जिकडे- तिकडे दिसायला सुरुवात होते. त्याच बरोबर चेरी-ब्लॉसम्स, आल्मन्ड-ब्लॉसम्स, ऍपल-ब्लॉसम्स आणि मॅग्नोलिया सारख्या झाडांना बहार येऊन सगळी झाडं गुलाबी होतात पुर्णपणे! संपूर्ण झाड नुसतं फुलांनी डवरलेलं असतं. फुलांशिवाय दुसरं काही-काही दिसत नसतं त्यावर! चेरी-ब्लॉसम्स हे खरंतर जपानचं राष्ट्रीय-फुल! जपानमध्ये ज्याला ‘साकुरा’ म्हणतात! १९९० मध्ये जर्मनीच्या एकत्रीकरणाच्या आनंदात जपानने हे झाड भेट म्हणून जर्मनीला दिलं आणि बऱ्याच ठिकाणी त्या झाडाची त्यावेळेला लागवड करण्यात आली म्हणे. बॉन शहरात या चेरी-ब्लॉसम्सचं फेस्टिवल असतं. तिथे एका रस्त्यावर दोन्ही बाजुने चेरी-ब्लॉसम्सच्या झाडांची लागवड केलेली आहे. त्यामुळे एप्रिलच्या सुरवातीला, वसंत ऋतु सुरु होतो तेव्हा हा पुर्ण रस्ता गुलाबीच्या विविध छटांनी नटलेला असतो असं ऐकलंय. अजुन त्यादरम्यान बॉनमध्ये जायचा योग आलेला नाही! याच सुमारास मग वेगवेगळ्या पक्षांचा किलबिलाट ऐकू येतो. वेगवेगळ्या प्रकारचे किडे बाहेर येतात. नवनिर्मितीचा उत्सवच असतो ना तो!

12963658_775279019240395_2531910850309912820_n

ही फुलं बहुदा आल्मन्ड ब्लॉसम्स असावीत. २०१६ च्या वसंत ऋतूत डार्मस्टाटमध्ये काढलेला फोटो!

13063179_781601231941507_4083976440245590524_o

ओळीने रस्त्याचा एका बाजूला लावलेली चेरी ब्लॉसम्स. डायडेसहाइम मध्ये २०१६ च्या वसंत ऋतूत काढलेला फोटो!

जसा युरोपमधला वसंत ऋतू रंगीबेरंगी तसा इतरही ठिकाणी असणारच ना! माझ्या इन्स्टाग्रामवरच्या सायली महाजन या चित्रकार मैत्रिणीला साऊथ आफ्रिकेत काही महिने राहण्याची संधी मिळाली होती. तिथला वसंत ऋतू साधारण ऑक्टोबरमध्ये येतो. त्यावेळी तिने तिथल्या जॅकरँडाच्या झाडांबद्दल फार छान लेख आणि फोटो तिच्या फेसबुक ब्लॉगवर टाकले होते. त्याची लिंक इथे देत्ये! नक्की वाचा!

आपल्या भारतात तर आपल्याला सगळ्या लहान-लहान गोष्टींचासुद्धा उत्सव करण्याची जन्मजातच सवय असते! आणि आपले सण-उत्सव हे सुद्धा निसर्गाच्या जवळ जाणारेच आहेत! हां, आता आपला उष्णकटिबंधीय देश असल्यामुळे, वातावरणात होणारे बदल युरोप इतके पटकन आपल्याकडे लक्षात येत नाहीत. पण हळुहळु बदल तर होतंच असतात ना. दुर्गा भागवतांनी त्यांच्या ‘ऋतुचक्र’ पुस्तकात निसर्गात असे प्रत्येक महिन्यात होणारे बदल इतके सूक्ष्मपणे टिपलेत. मग त्यात फक्त झाडं- फुलं-फळं नाहीत तर किडे, प्राणी, पक्षी, मुंग्या, एवढंच काय चंद्राच्या प्रत्येक ऋतूमध्ये बदलणारा शीतलपणा, त्याच्या दिसण्यात होणार बदल याचं काय सुद्धा सुंदर वर्णन आहे! आपल्याकडे गुढी-पाडव्यापासून नवीन वर्षाची सुरुवात करण्याचा मान वसंत ऋतूला दिलाय! वसंत ऋतूची सुरुवात आपल्याकडे युरोपापेक्षा थोडी लवकर, म्हणजे फेब्रुवारीतच होते! आणि संपतो ही लवकर, एप्रिलच्या सुरवातीला साधारण! वसंतात अमलताश (किंवा ज्याला बहावा सुद्धा म्हणतात), गुलमोहोर बहरतात. आंब्याला मोहोर येऊन त्याचा घमघमाट सुटतो. शेवटी आंब्याचा मोहोर याला युरोपियन स्टाईलमध्ये मँगो ब्लॉसम्स म्हणता येईल, नाही का? कारण चेरी, आल्मन्ड, ऍपल यांचा फळ धरण्याच्या आधीचा टप्पा म्हणजे ब्लॉसम्स. आपल्याकडचा आंब्याचा मोहोर हा सुद्धा तोच प्रकार आहे ना? त्याच बरोबर शेवरी, पळस, चाफा यांच्यासारखी अनेक फुलं बहरतात. या सगळ्या निसर्गात दिसणाऱ्या रंगांचा उत्सव वसंतात असतो म्हणूनच तर रंगपंचमी सारखा सण याच सुमारास भारतात साजरा करतात.

आपल्याकडचा निसर्ग हा इतका आपल्या संस्कृतीत मुरलाय की आपल्याकडच्या कलांमधुनसुद्धा हे सगळे ऋतु डोकावत असतात. संगीतात प्रत्येक ऋतूचे वर्णन करणारे, त्या ऋतूमध्ये गायले जाणारे असे राग, किंवा गीत-प्रकार आहेत. म्हणजे आत्ता आपण वसंताबद्दल बोलताना बसंत रागानेच सुरुवात करायला हवी नाही का? राजबिंडा राग आहे हा! तार सप्तकात उंच-उंच गायला जातो! (मी गाण्यातली फार काही जाणकार वगैरे नाही. बेसिक संगीत विशारद पर्यंतच शिक्षण घेतलंय फक्त! पण चांगल्या संगीतामधले-रागांमधले भाव कळायला शिक्षण घ्यायला लागत नाही असं माझं मत आहे.) तर आपण बसंत रागाबद्दल बोलत होतो- मी बसंत राग शिकले तेव्हा सुदैवाने तोच ऋतू सुरु होता. हे असं झाल्यामुळे हा राग ना जरा जास्तच लाडका झालाय माझा! होळीचं वर्णन असलेली ‘फगवा ब्रिज देखन को चलो री!’ ही प्रसिद्ध बंदिश मला आमच्या सरांनी शिकवली होती! तसाच या ऋतूत गायला जाणारा अजुन एक महत्वाचा राग म्हणजे ‘बहार’! खरंतर जर बसंत आणि बहार ची शास्त्रीय दृष्ट्या माहिती पाहिली तर दोघांमध्ये लागणारे स्वर खूपच वेगवेगळे आहेत. आहे की नाही गंमत! भारतीय संगीताची हीच तर मजा आहे. अगदी एकूण-एक स्वर सारखे असणारे भूप-देशकार ही रागांची जोडी! मात्र एक राग पहाटे गायला जातो तर एक तिन्हीसांजेला! आणि इथे बसंत आणि बहार मध्ये लागणारे स्वर वेगळे असून सुद्धा मजा अशी की दोन्ही राग एकाच ऋतूत गायले जातात! पण बसंतातला रुबाबदार, तरी विरागीपणा मात्र या बहार रागात नाही! तो वसंताचं चंचल, अवखळ रूप त्याच्या स्वभावातून दाखवतो. पण या दोन्हीचं अगदी एकजीव मिश्रण होऊन बसंत-बहार सारखा सुंदर राग निर्माण झालाच आहे! या अशा रागांप्रमाणेच होरी आणि चैती सारखे ठुमरीचे गोड प्रकार बसंतात गायले जातात. पण गंमत अशी की हे प्रकार वसंतात गायल्या जाणाऱ्या रागांमध्येच बांधलेले असतात असंच काही नाही हां! या गीतप्रकारांमधला चैती हा प्रकार मी तर अगदी गुढी पाडव्याच्या दिवशी पाडवा पहाटला पहिल्यांदा ऐकला आणि या गीतप्रकाराच्या प्रेमातच पडले! खरंतर २०१४ मध्ये अश्विनी भिडे देशपांडे यांचा एक लेख लोकसत्तेत प्रकाशित झाला होता. तो त्यावेळी मी वाचला होता. आणि सुदैवाने तो आत्ताही मला लोकसत्ताच्या साईटवर सापडलाय! इथे त्याची लिंक देत्ये! तो जरूर वाचावा असा आहे! त्यात या वसंतातल्या राग आणि गीतप्रकारांबद्दल फार लालित्यपूर्ण शैलीत लिहिलंय त्यांनी! वसंतात गायले जाणारे काही रागांच्या लिंक्स मी इथे देत्ये! नक्की ऐका!

पंडित भीमसेन जोशी-फगवा ब्रिज देखन

विदुषी वीणा सहस्रबुद्धे- होरी

गिरीजा देवी- चैती

राग बहार- पंडित जसराज

केतकी गुलाब जुही-पंडित भीमसेन जोशी, मन्ना डे- राग बसंत बहार

कुमार गंधर्व- राग बहार

थोडक्यात काय, तर युरोपमध्ये आल्यावर इथलं ऋतुचक्र ‘मी-मी’ म्हणून माणसाचं लक्ष त्याच्याकडे ओढूनच घेतं! म्हणून त्यातली मजा लक्षात आली. आणि मग परत मागे भारताकडे वळून पाहिल्यावर असं जाणवलं की अरे! हे तिथे भारतात सुद्धा हे ऋतुचक्र, हा वसंत ऋतू आजुबाजुच्या निसर्गातून आपलं अस्तित्व subtle पद्धतीने का होईना पण जाणवून देत होताच की, आपण सण सुद्धा ऋतुचक्र आहे म्हणूनच साजरे करत होतो! पण रोजच्या कामाच्या धबडग्यात, निसर्गातले ते बदल पाहून न पाहिल्या सारखं करत होतो बहुदा! आजुबाजुच्या माणसांच्या कोलाहलात आपण ते काही समजुनच घेत नव्हतो!

 

टीप: नेदरलँड ट्युलिप गार्डन मधले फोटो मृण्मयी परचुरे, दिशा रोंघे, धनश्री जोशी आणि ऋत्विक केळकर यांनी मिळून काढले आहेत!

Advertisements

6 thoughts on “बन बन आज फूली बसंत बहार!

 1. Harsh Kadepurkar says:

  चि. मृण्मयी

  आताच आम्ही दोघांनी तुझा नवा लेख वाचला. खूप आवडला. अभिनंदन.

  नासिकमधून ‘शब्दमल्हार’ या नावाचे एक नवीन मासिक फेब्रुवारी २०१८ पासून सुरू झाले आहे. अंक चांगला असतो.
  मला असे वाटते की तुझे लेख त्यात प्रकाशित व्हावेत. तुला मान्य असेल तर मला तसे कळव. पुढचे मी पाहीन.

  अनेक आशीर्वाद

  कडेपूरकर काका व काकू

  Sent from my iPad

  >

  Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s