पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या माणसांचा देश!

‘पुस्तकं’ हा माझ्यासाठी फार जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे इथे जर्मनीमध्ये आल्यावर इंग्रजी आणि मराठी पुस्तकांची कमतरता खूप जाणवते! सामानाच्या मर्यादित वजनामुळे फारशी पुस्तकं इथे घेऊन येणं शक्य नसतं. त्यामुळे इथेच काहीतरी खटपट करुन मराठी नाही तर निदान इंग्रजी पुस्तकं तरी मिळवण्याचा मी प्रयत्न करत असते. पुस्तकांशी संबंधीत काही माहिती किंवा पुस्तकं मिळवण्याच्या सोर्स याबद्दल काही संभाषण चालू असेल तर आपोआप कान टवकारले जातात. इथे ट्रेन/ट्राम/बस मधुन येता-जाताना, रांगांमध्ये थांबलेलो असताना वेगवेगळ्या वयोगटातली आजुबाजुची कित्येक मंडळी पुस्तक वाचण्यात दंग असतात. आजुबाजुच्या लोकांमधल्या निदान ३-४ माणसांच्या डोळ्यासमोर स्मार्टफोनऐवजी एखादं पुस्तक, मासिक किंवा किंडल दिसतं बऱ्याचदा! काही लोक तर पुस्तक वाचण्याच्या बाबतीत क्रेझी असतात! गेल्या वर्षी उन्हाळ्याच्या दिवसात ऑफिसमधून घरी जाताना रोज मला एक माणुस दिसायचा. त्याच्या एका हातात डोळ्यासमोर धरलेलं पुस्तक आणि दुसऱ्या हातात कुत्र्याच्या गळ्यात बांधलेला बेल्ट. ते कुत्रं पुढे धावत असायचं. हा त्याच्या मागोमाग धावायचा आणि एकीकडे पुस्तक डोळ्यासमोर असायचंच. मला फार गंमत वाटायची रोज त्याची ही कसरत पाहुन!

जर्मनीमध्ये एक मात्र मी पाहिलं, की साधारण सर्व शहरांमध्ये, गावांमध्ये जुन्या पुस्तकांचं एखादं तरी दुकान असतं! उन्हाळ्यात फ्ली-मार्केटमध्ये किंवा सिटी सेंटरला सुट्टीच्या दिवशी काही लोकं छोटा तंबू ठोकून कधी-कधी जुनी पुस्तकं विकायला बसलेली असतात! चांगली पाच-सहा पुस्तकं घेतली तर बरीच किंमत कमी सुद्धा करतात! मी अधुनमधुन जुन्या पुस्तकांच्या दुकानात फेरफटका मारत असते. तिथे बरीचशी पुस्तकं जर्मनमध्ये असली तरी फॉरीन-लॅन्ग्वेज बुक्स विभागात इंग्रजी पुस्तकांचं एखादं कपाट किंवा रॅक असतोच. त्यात एखाद-दुसरं चांगलं आणि आपल्या बजेट मध्ये बसेल असं पुस्तक हाती लागतंही. कधीतरी जर्मन पुस्तकं चाळायलाही मजा येते. या भाषेत कोणकोणत्या प्रकारची पुस्तकं प्रकाशित होतात याची थोडीफार कल्पना येते. काही अगदी जुनी पण सुरेख फोटोग्राफी असलेली पुस्तकं असतात. काही अगदी जीर्ण झालेल्या दुर्मिळ प्रती बऱ्यापैकी महाग किमतीला विकायला ठेवलेल्या असतात! खालपासुन पार वरपर्यंत रॅक्समध्ये एकावर एक रचून ठेवलेली पुस्तकं, दोन रॅक्समध्ये असलेली जेमतेम एक माणूस मावेल अशी निमुळती जागा, वरची पुस्तकं काढायला ठेवलेल्या शिड्या, आणि तो जुन्या पुस्तकांचा वास! काही पुस्तकं तर कधी कधी चक्क किलोवर सुद्धा विकायला ठेवलेली पाहिल्येत मी!

एकदा असंच पुस्तक चाळताना एका जर्मन पुस्तकावर बुक-क्रॉसिंगचा कागदी टॅग लावलेला दिसला. त्यावर एक नंबर होता, हात आणि पाय असलेलं आणि धावत कुठेतरी निघालेल्या पुस्तकाचा फोटो होता आणि सुचना लिहिली होती. त्याचा अर्थं असा होता -‘मी एक स्पेशल पुस्तक आहे. मी जगभर प्रवास करत आहे, नव्या मित्रांना भेटत आहे. कृपया bookcrossing.com वर माझी नोंदणी करा.’- हे वाचल्यावर मला उत्सुकता वाटली. घरी येऊन bookcrossing.com वर जाऊन पाहते तर काय! पुस्तकांचं केवढं मोठं जग होतं ते. bookcrossing म्हणजे काय यात फार खोलात जाऊन मी काही या पोस्टमध्ये सांगत नाही. त्याची सविस्तर माहिती त्या साईटवरच वाचायला मिळेल. पण थोडक्यात, आपली वाचुन झालेली, अनेक दिवस कपाटात बंद पडून राहिलेली पुस्तकं योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची आणि त्याच बरोबर आपण दिलेलं आपलं ते पुस्तक कोणत्या वाचकाच्या हातात, जगाच्या कुठल्या कोपऱ्यात प्रवास करतंय हे जाणुन घेण्याची सोयच होती ती! त्या साईटवर जगभरातल्या बुक क्रॉसिंगमध्ये सहभागी झालेल्या लोकांची संख्या, या उपक्रमात आत्ता या क्षणी किती पुस्तकं प्रवासात आहेत याचा स्टॅटिस्टिकल डेटा दिलेला आहे; स्थानिक पातळीवरचे बुक-क्रोससिंग झोन्स आहेत. माझ्या शहरात सुद्धा ४-५ असे छोटे बुक-क्रॉसिंग झोन्स आहेत हे मला समजलं. ते तेवढ्या-तेवढ्या भागात अशी पुस्तकांची देवाण-घेवाण करत असतात.

या बुक क्रॉसिंगचाच भाऊ-बंध म्हणजे öffener bücherschränke म्हणजेच public bookcases! मला बसमधुन कामावर जाताना रोज एका ठिकाणी पुस्तकांनी भरलेलं कपाट रस्त्याच्या कडेला ठेवलेलं दिसायचं. थोडेदिवसांनी मला या उपक्रमाबद्दल समजलं. जर्मनीमधेच सुरु झालेल्या या उपक्रमात, बहुतेकवेळा रेसिडेन्शीअल एरियामध्ये, किंवा गार्डन्समध्ये पुस्तकांचं कपाट भरून ठेवलेलं असतं. कधी-कधी एखाद्या कॅफेमध्ये किंवा चर्चमध्ये ही असु शकतं! कपाट थंडी, वारा, ऊन, पाऊस, बर्फ या कशामुळेच खराब होणार नाही अशाप्रकारे तयार केलेलं असतं. लायब्ररीयन सारखा कोणताही माणुस लक्ष ठेवायला, नोंदी करायला तिथे बसलेला नसतो. हवं ते पुस्तक उचलायचं, तिथे बसुन वाचायचं किंवा घरी घेऊन जायचं, वाचुन झालं की परत आणुन ठेवायचं किंवा त्याऐवजी/त्याबरोबर दुसरं एखादं पुस्तक आणुन ठेवायचं म्हणजे त्या कपाटात नव-नवी पुस्तकं येत राहतात आणि लोकांना तऱ्हेतऱ्हेची पुस्तकं वाचायला मिळतात. हे सगळं विश्वासावर चालतं. काही ठिकाणी हा उपक्रम यशस्वी होऊ शकला नाही, पण बहुतांशी हा उपक्रम सुरळीत सुरु आहे. हे सगळं किती छान आहे नाही का?! हे सगळं शिस्तबद्ध पद्धतीने आचरणात आणणारे आपल्यासारखे सामान्य नागरिक आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवायला, शिस्त लावायला कोणतंही सरकार किंवा राजकारणी, किंवा कुठलाही पक्ष यामागे नाही. पण लोकांसाठी सहजपणे पुस्तकं उपलब्ध असावीत, ती येता-जाता लोकांना दिसावीत, ती त्यांनी हाताळावीत, वाचावीत हे प्रत्येकाला वाटतंय. शहाण्या, जबाबदार समाजाचंच हे लक्षण नाही का? असे छोटे-छोटे उपक्रम भारतात/महाराष्ट्रातसुद्धा होऊ शकतात. आपापल्या शहरात, आपण राहतो त्या भागात लोकं एकत्र येऊन, शिस्तीत, न भांडता असे बरेच उपक्रम राबवू शकतात. राबवले जातही असतील पण प्रमाण वाढायला खूप वाव आहे. बुकक्रॉसिंगच्या बाबतीतही तेच! उत्सुकता म्हणुन मी त्यांच्या साईटवरचं स्टॅटिस्टिक्स पहात होते. तर भारतातली या उपक्रमात सहभागी होणारी मंडळी कमीच होती, पण महाराष्ट्रातली लोकांची संख्याही काही फार नव्हती. पुणे-ठाणे-मुंबई सोडलं तर बाकी शहरात-गावातल्या सहभागी मंडळींचा आकडा तर फारच नगण्य होता. त्यात पुन्हा हे फक्त सहभागी मंडळींचे आकडे होते. ‘रीसेन्ट बुक क्रॉसिंग रेकॉर्ड्स’ मध्ये कुठेच भारतीय/मराठी लेखकाच्या पुस्तकाचा रेकॉर्ड तर नव्हताच पण दुर्दैवाने भारतातलासुद्धा एकही रेकॉर्ड नव्हता. आज कित्येक पुस्तकं वाचनालयांमध्ये, अनेकांच्या घरांमध्ये कपाटात बंद होऊन, धूळ खात पडलेली असतात. मुंबईतल्या पावसात वेळेत लक्ष न घातल्याने अनेकांची पुस्तकं पाण्यात ओली होऊन कामातून गेली आहेत. अशी पुस्तकं योग्य व्यक्तींच्या हातात क्वचितच पडतात. बुक-क्रॉसिंग प्लॅटफॉर्मशी संलग्न न होता, लहान पातळीवरही लहान बुक क्रॉसिंग झोन सारखं काहीतरी तयार करता येऊ शकतं. काही लोकं आत्ताही असं काही करत असतील पण त्याची व्याप्ती वाढणं गरजेचं आहे. मुळात असं काही करता येऊ शकतं या बद्दलच लोकांना सांगितलं जायला हवं!

इथल्या  लायब्ररीजबद्दल तर काय सांगावं! प्रत्येक शहराची एक सेन्ट्रल लायब्ररी असते! म्हणजे युनिव्हर्सिटीमधल्या लायब्ररीज वेगळ्याच, पण त्या-त्या शहराची अशी एक स्वतंत्र लायब्ररी! मग त्यात पुस्तकं ही असतात आणि चांगल्या-चांगल्या चित्रपटांच्या सीडीज सुद्धा ठेवलेल्या असतात! विषयवार वेगवेगळे विभाग, बसायला ऐसपैस जागा, कोच, आरामखुर्चा, टेबलं व्यवस्थित सगळं! लहान मुलांच्या पुस्तकांचा विभागसुद्धा तेवढाच मोठा! उगाचच लहान मुलांचा म्हणून जागेचा कंजुसपणा नाही! तिथे त्यांना हाताळता येतील अश्या लेव्हलला ठेवलेली पुस्तकं! त्यांच्यासाठी स्पेशल टेबलं-खुर्च्या, सोफा! लहान-लहान चौथी-पाचवीतली मुलं मस्त आपलं-आपलं पुस्तक निवडून वाचत बसलेली असतात किंवा आपली-आपली लायब्ररीयनकडे जाऊन नवं पुस्तक नोंदवून, जुनं देऊन व्यवस्थित पावती घेतात. त्यांच्यासाठी मग वेगवेगळे उपक्रम असतात. आठवड्यातून एकदा पुस्तक वाचुन दाखवायचा कार्यक्रम असतो.(या कार्यक्रमाची जाहिरात कुठे दिसली की मला ‘यु हॅव गॉट अ मेल’ मधली मेग रायन आठवते! तिचं ते पुस्तकांचं दुकान हेही मला तो चित्रपट आवडण्यामागचं एक कारण होतं! 😉 😀 ) याचबरोबरीने बुक-बस नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे फिरती लायब्ररी! ही बस अशा लोकांकरता असते जे लायब्ररीत येऊ शकत नाहीत! उदाहरणार्थ ‘ओल्ड एज होम्स’मध्ये रहाणारी माणसं! किंवा जिथे अगदी लायब्ररीला ऍक्सेस नसणारी काही दूर-दूरची गावं. या बसेस दिसतात कधीकधी शहरात सुद्धा! असो, हे सगळं आपल्याकडे करावं अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. अजुन बऱ्याच लोकांच्या मूलभूत गरजाच भागत नाहीत आपल्याकडे! मग वेल्स मधल्या हे-ऑन-वायच्या धर्तीवर भिलार-पुस्तकांचं गाव केलंय हे काय कमी आहे!? पण यातले बरेचसे उपक्रम आपल्यासारखे सामान्य नागरिक त्यांच्या-त्यांच्या लहान स्तरावर नक्कीच राबवू शकतात!

शेवटी, चांगल्या पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या आणि चांगलं काही वाचणाऱ्या माणसांचा शहाणा, जबाबदार आणि समजुतदार समाज घडवण्यात महत्वाचा वाटा असतो, नाही का?

10 thoughts on “पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या माणसांचा देश!

  1. Ravindra Kashelkar says:

    हे पुस्तकांचे उपक्रम वाचून आश्चर्य वाटतं. बूक क्रॉसिंग आणि पब्लिक बूक केस असे उपक्रम तर वाचले पण नव्हते . जर्मनी हा देश इतर युरोपीय देशांपेक्षा पुढे का आहे त्याचं कारण या पुस्तकांत दडलंय .

    Liked by 1 person

    • mrunmayiparchure says:

      खरंय रवी काका! बुक क्रॉसिंग हा जगभर व्यापलेला उपक्रम आहे. पण पब्लिक बुक केस मात्र इथेच जर्मनीमध्ये सुरु झाला. ऑस्ट्रिया, स्वित्झरलँड मध्ये सुद्धा राबवला जातो असं ऐकलंय! बाकी देशांचं माहीत नाही! Btw, बुक फेरीज नावाचा पण एक जगात सर्वत्र चालणारा उपक्रम आहे. त्याबद्दल या पोस्ट मध्ये लिहायचं विसरले. भारतातल्या पुणे-मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये सुद्धा तो सुरु झालाय म्हणे!

      Thanks for your response!! 😀 🙂

      Liked by 1 person

  2. Supriya says:

    It’s changing here slowly !
    London madhe anubhavle hote. Library che member ship card japun thevlet 🙂 souvenir !
    But it has changed alot here in pune. Lot of activities exhibitions n new upkram. Still finger crossed!!
    Nicely written article looking forward:)
    (Something on old palaces /kingdoms /churches/local historical monument plz)
    All the best…

    Liked by 1 person

    • mrunmayiparchure says:

      Thanks a lot! Library che membership card as a souvenir…so nice! :)…Actually, there are considerable number of groups and organisations in big cities like Pune, Mumbai, Thane and even Nagpur working for good causes like these…barech upakram rabavle jataat…je ofcourse aplya population chya proportion madhe vadhayla havetch…pan tari…that’s fine…agdich kahi nahi asa nahiye…pan aplyakade problem haa ahe ki everything is restricted to these cities….nothing goes beyond these cities! 😦
      Ani asla tar phaar lahaan lahaan circles madhe asta…majority lokanparyant pochatch nai

      Btw, yes…will surely write on historical places I visit…haven’t travelled much since a long time due to load in studies…but will plan and write for sure…have you read the posts on German rivers, Salzburg, Göttingen??

      And, Thanks for your response!! 🙂 🙂

      Like

  3. shabdavli says:

    भारतामध्ये/ महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या आमच्यासारख्या वाचकांसाठी अशी माहितीपूर्ण पोस्ट म्हणजे पर्वणीच आहे.
    कॉम्प्युटर्स आणि स्मार्टफोन्स च्या युगामध्ये पुस्तक वाचणारी मंडळी मिळणे कठीणच आहे. पण जगाच्या कोपऱ्यात कुठेतरी अशी आगळी वेगळी परंपरा सुरु झाली हे वाचून समाधान वाटले.
    शब्दांना बंधन नसते असे म्हणतात आणि आज त्याचेच एक उदाहरण वाचले.
    आयुष्यात कधीतरी यातलं एखाद पुस्तक हाती यावं आणि मग आपणही या साखळीचा भाग बनून जावं हीच अपेक्षा !!!
    तुमच्या पोस्टसाठी धन्यवाद !!!! 🙂

    Liked by 1 person

Leave a reply to mrunmayiparchure Cancel reply