एक आगळी-वेगळी अंगत-पंगत

इथे जर्मनीमध्ये, विशेषतः विद्यार्थ्यांकरता, वोह्नगेमाइनशाफ्टची (ज्याला इथली लोक WG-‘वेगे’ असं म्हणतात) पद्धत आहे! हे वेगे म्हणजे एकाच घरात ३-४ लोकांनी एकत्र राहणं. इथे प्रत्येकाला आपली-आपली स्वतःची खोली असते आणि स्वयंपाकघर आणि बाथरूम हे मिळून वापरायचं असतं. कधी हे शेअरिंग २ जणांमध्ये असतं तर कधी ३/४. काही स्टुडन्ट-वेगे मध्ये हे अगदी १० जणांपर्यंत जाऊ शकतं! भारतात मुली-मुली एकत्र आणि मुलं-मुलं एकत्र, किंवा मुला-मुलींची वेगवेगळी हॉस्टेल्स असला प्रकार आहे. इथे मात्र असलं काही नसतं. वेगे मध्ये मुलं-मुली एकत्र सगळं शेअर करुन रहात असतात. वेगे या प्रकाराबद्दल मी भारतात जर्मन शिकले तेव्हा वाचलं होतं. जर्मनीमध्ये आल्यानंतर फक्त जर्मनच नाही तर असंख्य देशांमधली असंख्य माणसं माझ्या आजुबाजुला वावरत असतात! त्याच प्रमाणे वेगे-मेट्ससुद्धा असतात! पहिल्या वर्षी इथे आल्या-आल्या एक पॅलेस्टाईनची मुलगी, एक दक्षिण भारतीय मुलगी आणि एका घाना देशातून आलेल्या माणसाबरोबर मी वेगे शेअर करत होते. नंतर एका पाकिस्तानी मुलाचीही भर त्यात पडली होती. मी इतक्या वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या लोकांबरोबर राहीन, असं मला जर्मनीत यायचं ठरलं तेव्हा सुद्धा वाटलं नव्हतं! वेगवेगळ्या परिस्थितीतुन आणि सांस्कृतिक वातावरणातुन आलेल्या माणसांच्या विविध तऱ्हा जवळून पहायचं ठिकाण म्हणजे हे वेगे! प्रत्येक वेगेचं वातावरण हे वेगवेगळं! तिथे राहणाऱ्या माणसांवर अवलंबून असलेलं! प्रत्येकाची स्वयंपाकाची तऱ्हा वेगळी! कोणी रोज सकाळ-संध्याकाळ साग्रसंगीत स्वयंपाक करणारं, तर कोणी नुसतंच बागेट्स, ब्रेड्स आणि स्मूदीज वर भागवणारं. कोणी भल्या सकाळी उठून स्वयंपाक करणारं तर कोणी रात्री ९-१० वाजता निवांत स्वयंपाक सुरु करुन मग ११-१२ पर्यंत जेवणारं! कोणी एकटं-एकटं, आपलं-आपलंच स्वयंपाक करणारं तर कोणी ही भली मोठी मित्रांची जनता जमा करून मग एकत्र स्वयंपाक करणारं! कोणी कडवं शाकाहारी, अगदी ‘व्हेगन’सुद्धा, तर कोणी जेवणांत कुठल्या प्राण्याचं मांस नसेल तर चैन न पडणारं! सगळ्यांच्या स्वच्छतेच्या कल्पनाही वेगवेगळ्या! ही अशी सगळी माणसं एकत्र येऊन बरचसं घर एकत्र वापरत असतील तर कितीतरी चांगले आणि वाईटही अनुभव येत असतील याची कल्पना करा! नंतर माझं जर्मनीतलं दुसरं घर हे स्टुडिओ अपार्टमेंट होतं! त्यावेळेला मला या वेगे प्रकाराचा कंटाळा आला होताच आणि सुदैवाने तसं स्वतंत्र घरही मला माझ्या बजेट मध्ये बसेल अश्या भाड्यात मिळालं होतं!

नुकतंच २ महिन्यांपुर्वी मी परत घर बदललं! पुन्हा एकदा वेगे! या वेळेला पुन्हा एका वेगळ्या देशातल्या मुलीबरोबर! या वेळेला लॅटिन अमेरिकन, म्हणजे खरं तर इक्वेडोरियन-मानुएला- मला एका महिन्याकरता वेगे-मेट म्हणून मिळाली. आमची फार पटकन एकमेकींशी मैत्री झाली. कामावरून घरी आल्यानंतर कितीतरी वेळ आम्ही दोघी गप्पा मारत बसायचो. वेळ कसा जायचा ते समजायचं नाही. इंग्रजी फारसं नीट येत नाही तिला. स्पॅनिश मातृभाषा आणि ८-९ वर्षांपासूनच्या जर्मनीतल्या वास्तव्यामुळे जर्मन बऱ्यापैकी येतं. पण अर्धं इंग्लिश-अर्ध जर्मन मध्ये कितीतरी वेळ गप्पाष्टकं चालायची आमची! आमचे देश, आमच्या भाषा, सण-समारंभ या वरवरच्या गोष्टींपासून ते थेट आमची कुटुंब, आमचं आमच्या-आमच्या कुटुंबातील प्रत्येकाशी असलेलं नातं, मित्र-मैत्रिणी, प्रियकर इथपर्यंत कितीतरी गप्पा! माझी आई मला साधारण ६ महिने भारतात जाता आलं नाही तर भाजण्या, वेगवेगळी पिठं, आवळा-सुपारी सारखे इथे न मिळणारे पदार्थ पार्सल करून पाठवत असते. एके दिवशी ऑफिसमधुन घरी गेल्यावर मी, आईने घरी तयार करून पाठवलेलं, पोह्याचं डांगर भिजवलं. तीही स्वयंपाकघरात त्यावेळी आली म्हणून तिलाही दिलं. तिखट असुनही बाईसाहेबांनी आवडीने २-३ लाट्या तोंडात टाकल्या. मग कसं केलं, रेसिपी वगैरे झाली आणि बोलता बोलता मी सांगितलं की हे मी केलं नाहीये, आईने पाठवलंय! हे ऐकल्यावर तिला इतकं आप्रूप वाटलं! मला म्हणली- आईने स्वतः तयार करून पाठवलंय?!! किती छान ना? This is like sending love from home!!

तिला आणि तिच्या इक्वेडोरियन प्रियकर मित्राला प्रवास करायला, वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे पदार्थ चाखून बघायला फार आवडतं! बऱ्याच ठिकाणी त्यांनी भटकंती केली आहे. सिंगापुरला गेलेले असताना त्यांनी पहिल्यांदा कुठेतरी भारतीय फूड खाऊन पाहिलं! अर्थातच पंजाबी, हे वेगळं सांगायला नको! त्यामुळे त्यांना नान-रोटी, दाल असले शब्द माहीत होते. तिचा मित्र नेपाळमध्ये महिनाभर राहिला होता तेव्हा तो रोटी करायला ही शिकला होता! त्या दोघांना तो पंजाबी प्रकार फारच आवडला होता, त्यामुळे आपण तसं परत करू म्हणून मागे लागली होती दोघं माझ्या! माझ्याकडच्या डाळी, कडधान्य पाहून डोळे विस्फारले होते तिचे..आणि मला मात्र या सगळ्याची फारच गंमत वाटत होती! तिचा मित्र आलेला असताना एकदा मी गुलाबजाम केले होते! ते दोघांनीही फार आवडीने खाल्ले! मलाही त्यांनी आरेपा नावाचा कॉर्नफ्लोअरचा पदार्थ आणि जगप्रसिद्ध ग्वाकामोल खिलवलं होतं.

IMG_20180324_221639

आरेपा आणि ग्वाकामोल. ग्वाकामोल हा ऍव्होकॅडो पासून बनवला जाणारा ‘डिप’ किंवा ‘सॉस’ सारखा प्रकार असतो! लॅटिन-अमेरिकन्सना हा प्रकार प्रचंड आवडतो! आरेपा म्हणजे लॅटिन अमेरिकन ब्रेड असं म्हणलं तरी चालेल! (फोटो फारसा बरा आलेला नाहीये! पण तरी साधारण कल्पना यावी या उद्देशाने टाकलाय!)

मग आम्ही इंडियन मेन कोर्स मील एकत्र मिळून करायचं ठरवलं. त्यांना अगदी काहीही करून माझ्या हातच्या भारतीय जेवणाचा आस्वाद घ्यायचाच होता! मला त्यांना पनीर-रोटी-दालपेक्षा काहीतरी वेगळं खायला घालायचं होतं. मग मनात विचार आला की आपलं मराठमोळं काहीतरी का नको? मग आईने दळून नुकत्याच पाठवलेल्या ताज्या-ताज्या उपासाच्या भाजणीचं थालीपीठ करायचं मी ठरवलं. दोघांनाही मी काय करत्ये ते पाहायची आणि ते सगळं स्वतः करून पहायची भारी हौस! मग हे करता करता ‘उपवास’ म्हणजे नेमकं काय? उपवास करतो म्हणजे खरंतर काही खायचं नसतं ना? मग या उपवासाला कसं काय खातात लोक? मग उपवासाला काय काय पदार्थ चालतात. मग साबुदाण्याचे लॅटिन अमेरिकेत बनवले जाणारे पदार्थ अश्या मस्त गप्पा सुरु होत्या आमच्या! मग जिरं घातल्यावर ते न्याहाळून झालं. भारतीय स्वयंपाक माहीत नाही पण भारतीय अन्न तर आवडतं, मग म्हणून कुठलेही भारतीय मसाले आणून ते कसे randomly कुठल्याही पदार्थात घालत असतात- याचं त्यांचं त्यांनाच हसू येत होतं. मग पीठ मळून झाल्यावर त्याची चव घेऊन झाली! मग मी थालीपीठ लावलं. ते लावत असताना माझ्या बोटांचे ठसे त्यावर कसे उमटतायत याचं कुतूहल दोघांना वाटत होतं. मी बोटाने त्यात भोकं पाडल्यावर तर त्यांना फारच गंमत वाटली. मी मात्र- आता यांना आपण केलेला हा प्रकार आवडतोय की नाही या चिंतेत होते! पहिलं थालीपीठ एका बाजूने भाजलं गेल्यावर उलथन्याने मी उलटलं तेव्हा- हे तू ना मोडता कसं काय केलंस? ते एका बाजुने भाजलं गेलंय हे तुला कसं काय कळलं?- मी फार काहीतरी सॉलिड्ड कसरत केल्ये असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. मला तर गंमतच वाटत होती त्यांच्या चेहऱ्यावरचे कौतुकाचे भाव पाहून! थालीपीठ खायला त्या दोघांनी पानं मांडली आणि शेजारी सुरी आणि काटाचमचा ही मांडून ठेवला! हे पाहिल्यावर मला हसूच आलं! मग एकाच हाताने तुकडा मोडून थालीपीठ कसं खायचं हे त्यांना शिकवलं! आणि अश्या प्रकारे तयार झालेलं पाहिलं थालीपीठ पानात पडलं आणि दोघांनी अर्ध्या मिनिटात त्याचा फडश्या पाडला! आणि ‘चला! आपण केलेला प्रकार दोघांना आवडला तर!’ असं मनात येऊन माझा जीव भांड्यात पडला! दोघांनीही दणकून भरपूर थालिपीठं खाल्ली आणि- आता आम्ही करतो तु शांतपणे जेवायला बस- म्हणून चक्क त्यांनी थालीपीठ लावून मला वाढलं! मग दोघांनी मिळून माझ्यासाठी स्वीट डिश तयार केली! Dulce de Leche हा कॅरॅमलाइज्ड दुधासारखा लॅटिन अमेरिकन पदार्थ आहे. ते घालून त्यांनी croissant सारखा पदार्थ केला होता. अश्या प्रकारे आमचं मराठी-लॅटिन अमेरिकन असं वेगळ्याच कॉम्बिनेशनचं त्या दिवशीचं जेवण होतं!

IMG_20180326_203910

मानुएलाने माझ्या करता लावलेलं थालीपीठ! व्यवस्थित झालंय की नाही?!! आणि न मोडता पानातसुद्धा नीट घालता आलंय अगदी! 😉 😀

 

IMG_20180326_203646

Dulce de Leche घालून तयार केलेले croissants! मान्य आहे, जरा ओबड-धोबड झालेत! पण लागत मात्र भारी होते! 😀

 

इथे युरोपियन देशांमध्ये असलेली इंडियन रेस्तरॉं फक्त पंजाबी किंवा साऊथ इंडियन पदार्थ देतात. त्यामुळे भारतातले इतर प्रांतातले पदार्थ बाहेरच्या लोकांना कळतच नाहीत. मानुएला आणि तिच्या मित्राला बोलता बोलता मी अनेक खाद्यप्रकार सांगितले, जे इथे मिळत नाहीत. आता त्यांना ते चाखायला भारतात माझ्याकडे यायचंय! पाहूया कधी योग येतो ते! हा दिवस आणि ते मिळून केलेलं जेवण मात्र कायम लक्षात राहील असंच होतं!

Advertisements

9 thoughts on “एक आगळी-वेगळी अंगत-पंगत

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s