उड्या मारणारा घड्याळाचा काटा!

साधारण १९वं शतक असेल ते! पृथ्वीवर तसं सगळं सुरळीतच चालू होतं. सुर्य त्याच्या वेळेला उगवत होता, मावळत होता. पृथ्वी सुर्याकडे ज्या दिशेने कलेल तिथे जरा लवकर सूर्य उगवायचा आणि उशिरा मावळायचा. त्याच्या विरुद्ध टोकाला जरा उशिरा सूर्योदय आणि लवकर सुर्यास्त व्हायचा! पण कामं सगळी घड्याळाच्या काट्यावरच चालली होती! १५-१६व्या शतकात पृथ्वीवरील माणसाने घड्याळ शोधून काढलं होतं ना! त्या आधीसुद्धा माणसाला वेळेचं भान होतंच, वेळ मोजण्याची-दर्शवण्याची यंत्रही होती- sundial clocks किंवा water clocks वगैरे वगैरे. पण आधुनिक वेळ मोजणारं आणि दर्शवणारं हे घड्याळ साधारण १६व्या शतकात माणूस वापरु लागला! हां, तर झालं असं की पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात राहणारा आणि घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालणारा माणूस हिवाळ्यात सूर्योदयापूर्वीच उठत होता आणि कामावर जात होता पण उन्हाळ्यात मात्र त्याच्या उठण्याच्या तास-दोन तास आधीच सूर्य डोक्यावर येत होता! अगदी हे असंच दक्षिण गोलार्धातही होत असे! सूर्योदयाच्या वेळेला लोकांनी उठलं पाहिजे याची अधून-मधुन त्या काळात टूम निघत असे! असं झालं की सूर्योदयाच्या वेळेला काही ठिकाणी चर्चबेल्स वाजवल्या जात, काही ठिकाणी तोफगोळे उडवले जात-जेणेकरून लोकांना लवकर जाग यावी! पण हे सगळं तेवढ्यापुरतंच, त्या गावापुरतं किंवा भागापुरतंच मर्यादित असे!
त्या काळात दक्षिण गोलार्धात न्युझीलंड मध्ये जॉर्ज हडसन नावाचा एक entomologist(कीटकशास्रज्ञ-किड्यांचा अभ्यास करणारा) राहायचा. तो त्या काळी शिफ्ट-ड्युटी करायचा. आता शिफ्ट ड्युटी म्हणजे सूर्योदय-सूर्यास्ताचं तंत्र बाजुला ठेऊन ठरलेल्या घड्याळातल्या वेळेला कामावर जाणं आणि ठरलेल्या वेळेला घरी येणं हे गरजेचंच होतं! पण याला मात्र उन्हाळ्यात हे असं करत राहणं फार खटकायचं! कामानंतरचा वेळ वेगवेगळे किडे गोळा करणे, त्यांचं निरीक्षण करणे या करता त्याला वापरायला आवडायचं. पण दिवसभर भरपूर सूर्यप्रकाश असून सुद्धा कामानंतर फार काळ उजेड रहायचा नाही! त्या उलट कामाच्या वेळेच्या बराच काळ आधीच सूर्योदय झालेला असे! त्याला असं वाटू लागलं की सकाळचा कितीतरी वेळ आपण वाया घालवतोय! त्या ऐवजी तास-दोन तास लवकर कामावर गेलो तर संध्याकाळी किडे शोधायला अजुन वेळ मिळेल! पण ठरलेल्या शिफ्टच्या वेळेच्या आधी कसं कामावर जाणार? तो जमाना flexi-time चा नव्हता ना! मग घड्याळाचा तासाचा काटा सगळ्यांसाठीच दोन तास पुढे सरकवायचा, म्हणजे मग वेळेच्या दोन तास आधीच त्याची शिफ्ट सुरु होईल आणि आधीच संपेल आणि कामानंतर बराच काळ उजेडात किडे गोळा करायला वेळ मिळेल हा एक तोडगा त्याला सुचला! मग त्याने सगळ्यांनाच कामानंतरचा रिकामा वेळ जास्त मिळावा या हेतूने १८९५ साली ही कल्पना मांडणारा एक पेपर सादर केला! उन्हाळ्यात घड्याळाचा तासाचा काटा दोन तास पुढे सरकवायचा आणि हिवाळ्यात परत तो आधीच्या जागी सरकवायचा! याला म्हणतात ‘डे लाईट सेव्हिंग(DST)’! पण ही कल्पना काही लगेच अमलांत आणली गेली नाही! इंग्लंड मध्ये १९०५ साली विल्यम विलेट नावाच्या गोल्फ खेळाडूने हीच कल्पना मांडली. उन्हाळ्यात दिवसभर भरपूर सूर्यप्रकाश असून सुद्धा गोल्फ खेळण्याकरता त्याला त्याचा पुरेसा उपयोग करता येत नाही अशी त्याची तक्रार होती(कोणाचं काय तर कोणाचं काय! नाही का?)! तरीसुद्धा हे कुठेही वापरात आणलं गेलं नाही. पहिल्या महायुद्धाच्या काळात जर्मन साम्राज्याने कोळश्याचा वापर कमी करण्याकरता,माणसांच्या कार्यक्षमतेचा दिवसा उजेडी जास्त लाभ घेता यावा या हेतूने डे लाईट सेव्हिंग १९१६ मध्ये सुरु केलं! पाठोपाठ रशिया, इंग्लंड आणि अमेरिकेनेही केलं! पण महायुद्धं संपल्यावर पुन्हा एकदा बऱ्याच देशात पहिले पाढे पंचावन्न झाले! पण परत एकदा दुसऱ्या महायुद्धात ते अमलांत आणलं गेलं आणि यावेळी मात्र ते युद्धानंतरसुद्धा वापरलं गेलं! १९७० मध्ये इंधनांची कमतरता भासू लागली तेव्हा उत्तर-दक्षिण गोलार्धातल्या बाकीच्या देशांनीही हे वापरायला सुरुवात केली ती कायमचीच!

Waste-of-Daylight-19-cover

विल्यम विलेटने डी.एस.टी. चा प्रस्ताव मांडायला अशी पॅम्प्लेट्स तयार केली होती. (वीकीमीडिया कॉमन्स फोटो)

पण हे सगळं इतकं साधं-सोपं नाही! आता अक्षांश-रेखांशाप्रमाणे(ज्याला आपण सोप्या भाषेत latitude आणि longitude म्हणतो!) पृथ्वीवर एकाच वेळी वेग-वेगळी वेळ आणि ऋतू असतात हे तर आपल्याला माहितेय! त्यामुळेच उत्तर गोलार्धात(म्हणजे साधारण उत्तर अमेरिका, युरोप) जेव्हा डे-लाईट सेव्हिंग सुरु होतं तेव्हा दक्षिण गोलार्धात(म्हणजे ऑस्ट्रेलिया,दक्षिण अमेरिका) डे लाईट सेव्हिंग संपतं. आणि यात पुन्हा तारखांचा गोंधळ असतो! सर्वत्र एक ठरलेली तारीख नाही. म्हणजे उत्तर अमेरिकेत आणि युरोपात डी.एस.टी. सुरु होण्याच्या तारखेत सुद्धा बऱ्याचवेळा आठवडा-दोन आठवड्यांचा फरक पडतो. आणि परत संपवण्याच्या तारखांच्या बाबतीतही तसंच. तीच गत दक्षिण गोलार्धाची! जर साधारण याच दरम्यान यु.एस.ए, युरोप आणि ऑस्ट्रेलिया या तीन खंडातल्या लोकांची कॉन्फरंस कॉल वर मिटिंग ठरवली तर वेळेतला गोंधळ होण्याची शक्यता फार मोठी असते! विमानांची उड्डाण-आगमनाच्या वेळांमधे गल्लत होऊ शकते! त्याच प्रमाणे काही देशांच्या काही भागांमध्येच डी.एस.टी. वापरलं जातं! उदाहरणार्थ, ब्राझील मध्ये फक्त उत्तर भागात, कॅनडाच्या काही भागात किंवा ऑस्ट्रेलिया मध्ये जवळ-जवळ अर्ध्या भागात डी.एस.टी.वापरलं जात नाही. यु.एस.ए मध्ये अरिझोना राज्यात वर्षभर प्रचंड उकाडा आणि सूर्यप्रकाश असतो. त्यामुळे डी.एस.टी.चा त्यांना असा काही उपयोग नाही! त्यामुळे त्या राज्यात ते वापरलं जात नाही! पण अरिझोना मधला नावाहो नेशन हा भाग मात्र डी.एस.टी. अमलांत आणतो. पण नावाहो नेशन मधेच होपी रिझर्वेशन नावाच्या भागात डी.एस.टी. वापरत नाहीत! आहे की नाही सगळा गडबड गोंधळ!! डोकं चक्रावुन जाईल एखाद्याचं सगळं समजुन घेता घेता! तर ते असो! आता या डी.एस.टी. चे जसे फायदे आहेत तसे आरोग्याच्या दृष्टीने तोटेही आहेत म्हणे! म्हणजे एक तास कमी झोप झाल्याने हृदयरोग, रक्तदाब किंवा नैराश्य येऊ शकतं म्हणे! म्हणूनच डी.एस.टी. नेहेमी शनिवार रात्र आणि रविवार सकाळ या मधल्या वेळात २-३ वाजता केलं जातं! जेणेकरून बहुतांश लोकांना रविवारी अपुरी झालेली झोप पूर्ण करता येईल आणि या सगळ्याचा फारसा परिणाम शरीरावर होणार नाही!
१०० वर्षांपूर्वी ऊर्जेची बचत व्हावी या हेतूने महायुद्धात ही पद्धत सुरु झाली पण आता डी.एस.टी. मुळे ऊर्जेची बचत न होता काही भागांमध्ये जास्त ऊर्जा वापरली जाते असं देखील काही लोकांचं मत आहे! याचं कारण माणसाची ऊर्जा वापरण्याची बदललेली पद्धत किंवा मनोरंजनाची बदलेली पद्धत हे असु शकतं! त्यामुळे डी.एस.टी. ची आताच्या बदललेल्या जगात खरंच गरज आहे का यावर फेरविचार व्हावा असंही काही लोकांचं मत आहे! पण हे सगळं काहीही असो- मला एका गोष्टीची फार गंमत वाटते- कामानंतर संध्याकाळी किडे गोळा करता यावे यासाठी जगाच्या एका कोपऱ्यात रहाणाऱ्या कुठल्याश्या एका माणसाने मांडलेली ही कल्पना आज जवळ जवळ अर्धं जग वापरतंय! आज जग घड्याळाच्या काट्यावर चालतंय, आपण सगळे त्या घड्याळातल्या वेळेचे गुलाम आहोत पण याच घड्याळाच्या काट्याला या माणसाने स्वतःच्या मर्जीखातर उडी मारायला लावली! म्हणजे- ‘जमाना हमसे है, माहोल हम बनाएंगे!’ किंवा ‘मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची, येईल त्या लाटेवर डुलणे नामंजूर!’ हे असले शेर याच्यासारख्या माणसांना शोभून दिसतात, नाही का!

25000493314_9ba29c4647_o

थंडी सुरु व्हायच्या आधी घड्याळाचा तासाचा काटा मागे उडी मारतो आणि उन्हाळा सुरु व्हायच्या आधी तोच काटा एक तास पुढे उडी मारतो (सोर्स-फ्लिकर-माईक लिश्ट-क्रिएटीव्ह कॉमन्स लायसन्स )

उद्या पासून आमच्या इथे जर्मनीत डी.एस.टी. सुरु होतंय! उत्सुकता म्हणून गुगलवर जरा शोधाशोध केली आणि केवढ्या गंमती-जमती समोर आल्या! त्या निमित्ताने म्हणलं जरा नवं काही लिहावं! म्हणून ही पोस्ट!

Advertisements

2 thoughts on “उड्या मारणारा घड्याळाचा काटा!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s