आयुष्य समृद्ध करणाऱ्या भाषा!

आपण भारतीय माणसं मुळात बहुभाषिक असतो. ३-४ भाषा तर आपल्याला सहजच येत असतात. वर पुन्हा त्या सहज कानावर देखील पडत असतात! इथे जर्मनी मध्ये तर एका बहुभाषिक देशाची नागरिक असणं मिरवलं देखील जातं कधीकधी माझ्याकडून! बऱ्याचवेळा इथे ‘इंग्लिश ही सर्व भारतीयांची मातृभाषा आहे!’ असा मोठा गैरसमज असतो लोकांचा! मग-माझी मातृभाषा मराठी आहे. भारतात कितीतरी भाषा बोलल्या जातात. इंग्रजांमुळे भारतीयांना इंग्रजी भाषेचं शिक्षण मिळालं.- असं बरंच काही त्यांना सांगितलं जातं. भारतात बोलल्या जाणाऱ्या अनेक भाषा या मुळभाषेच्या पोटभाषा किंवा बोलीभाषा नसून खरोखर वेगवेगळ्या भाषा आहेत हे सांगितल्यावर लोकांचे डोळे विस्फारतात.

पहिल्यापासुन मला इंग्रजी व मराठी वाचनाची आवड होतीच! पण खरं सांगु का- आपल्या भाषांचं वैविध्य, आपल्या मराठी भाषेतले वेगवेगळे बारकावे, त्यातल्या बोलीभाषा, हाताळले गेलेले साहित्य-प्रकार, इतर भाषांशी काही ठिकाणी जाणवणारं नातं, काही गंमतीशीर म्हणी-वाक्प्रचार या सगळ्या गोष्टींकडे माझं विशेष लक्ष जाऊ लागलं ते जर्मन शिकायला लागल्यापासून! जर्मनमधले व्याकरणाचे नियम, काही अल्फाबेट्सचा उच्चार करण्याचे नियम हे खरंतर मी इंग्रजीपेक्षा मराठीशी जास्त रिलेट करु शकले. आदरार्थी संबोधन इंग्रजीत नसलं तरी हिंदी-मराठीप्रमाणे जर्मन मध्ये आहे! J या अल्फाबेटचा उच्चार ‘य’ असा करतात. मराठीतसुद्धा काही बोलीभाषांमध्ये ‘राजा’चं ‘राया’ होतंच की! किंवा यमुनेला भारतात काही ठिकाणी जमुनासुद्धा म्हणतात! अशी अनेक उदाहरणं देता येतील. हे असं ‘ज’ आणि ‘य’ चं आंतरराष्ट्रीय साटं-लोटं असावं बहुदा! 😉

आपण एखादी नवी भाषा शिकतो तेव्हा सुरवातीला त्यातले शब्द, व्याकरण हे शिकतोच. पण जसजसे आपण त्यातल्या म्हणी, वाक्प्रचार शिकायला लागतो किंवा कविता शिकतो तेव्हा आपल्याला त्या संस्कृतीबद्दल, तिथल्या इतिहास-भुगोलाबद्दल, माणसांच्या रहाणीमानाबद्दल-त्यांचा पोशाख, खाद्यसंस्कृती, त्यांचे सण, हवामान, दाग-दागिने इथपासून ते थेट त्यांच्या प्रदेशातल्या राजकारणाबद्दलसुद्धा माहिती मिळू लागते. हे जसं जर्मन आणि जर्मनीच्या बाबतीत माझं होऊ लागलं तसा माझ्या मनात मराठीच्या बाबतीत असा विचार सुरु झाला. तेव्हा माझ्या लक्षात येऊ लागलं की आपण किती सहज एखादी म्हण किंवा वाक्प्रचार वाक्यात वापरतो, समोरच्याला त्यामागचा अर्थ माहीत असणार हे गृहीतच धरलेलं असतं आपण त्यावेळेला! कारण आपण ज्या-ज्या लोकांशी मराठी बोलतो त्या सगळ्यांची सामाजिक, भौगोलिक पार्श्वभुमी एकच असते. इतिहाससुद्धा एकच! पण नुकतंच मराठी शिकु लागलेल्या एखाद्या नवख्या विद्यार्थ्याशी बोलता-बोलता जर आपण ‘ध चा मा करणे’ हा वाक्प्रचार वापरला तर त्याला काय कळणार बिचाऱ्याला! त्यासाठी त्याला शनिवार वाड्यात गेलं नाही तरी निदान तो इतिहास ठाऊक असणं भाग आहे! किंवा ‘पालथ्या घड्यावर पाणी’, ‘हातच्या कंकणाला आरसा कशाला?’, ‘नाव सोनाबाई हाती कथलाचा वाळा’ अशा म्हणी आणि वाक्प्रचार ज्यांनी घडा, कंकण, वाळा पाहिला नाही त्यांना कशा बरं समजणार? तीच गोष्ट साहित्याची- ‘ श्रावणमासी हर्ष मानसी.. ‘ सारखी कविता कित्येक लोकांना तोंडपाठ असते! श्रावण महिन्यातल्या ऊन-पावसाचा खेळ पाहुन ‘श्रावणात घननीळा बरसला’ गाणं हमखास मराठी माणसाला आठवतच! पण ‘पाचूच्या हिरव्या माहेरी आलेलं श्रावणातलं हळदीचं ऊन’ ज्याने अनुभवलंच नाहीये तो कसा या गाण्याशी नातं जोडू शकेल, नाही का? जर्मनीमध्ये एप्रिल महिना हा मनमानी करणारा महिना समजला जातो. कारण एप्रिलमध्ये क्षणाक्षणाला ऋतू बदलत असतात अगदी! खरंतर वसंत ऋतूची सुरुवात झालेली असते, पण या महिन्याच्या मनात आलं ना तर तो अगदी हिमवर्षावही करतो! म्हणुन जर्मनीमध्ये ‘आप्रिल माख्ट वास एर विल’-‘एप्रिल त्याला हवं तसंच करतो’ म्हणुन फार प्रसिद्ध कविता आहे! ही कविता समजुन घ्यायला आधी जर्मनीतला एप्रिल समजुन घ्यायला हवा! इथे आल्यानंतरच्या पहिल्या एप्रिलमध्ये मी जेव्हा वातावरणातल्या अनपेक्षित बदलांबद्दल कुरकुर करू लागायचे तेव्हा इथले लोक मला ही कवितेची ओळ म्हणुन दाखवायचे!

भारतात जर्मन शिकत होते तेव्हा एवढं माहीत होतं की जर्मनी, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंडच्या काही भागात जर्मन बोलली जाते. पण तीनही ठिकाणी बोलली जाणारी जर्मन बऱ्यापैकी वेगळी आहे! जर्मनीमध्येसुद्धा प्रत्येक प्रांतातल्या बोलीभाषा थोड्याफार वेगळ्या आहेत हे सुद्धा ऐकुन माहीत होतं. मला काही लहान मुलांची जर्मन भाषेतली गोष्टीची पुस्तकं मिळाली होती. जर्मन सुधारावं या हेतुने मी ३-४ वाचलीही होती. त्यातुन अधे-मधे बव्हेरियन बोलीभाषा मधुनच डोकावुन जायची. इथे आल्यानंतर ठिकठिकाणी फिरताना फक्त बव्हेरियन नव्हे तर हेसिश, श्वेबिश सारख्या अनेक बोलीभाषा आहेत हे समजलं. त्या-त्या भागातल्या एखाद्या लहान खेड्यात गेलं तर त्या बोलीभाषेत लिहिलेली एखाद-दुसरी पाटीसुद्धा नजरेस पडते. हे म्हणजे मला अगदी आपल्याकडे अहिराणी, कोकणी, खानदेशी, वऱ्हाडी, मालवणी जशा बोलीभाषा असतात तसं वाटलं! एवढंच नाही, तर प्रत्येक प्रातांतले त्यांचे त्यांचे असे वेगवेगळे सण, विशेष खाद्यपदार्थ, त्या-त्या प्रांतात बनवली जाणारी त्यांची स्पेशल बियर हे तर असतंच पण त्या-त्या प्रांतातल्या लोकांची खास अशी आपली-आपली स्वभाव वैशिष्ट्यही असतात आणि या सगळ्यावरुन त्या-त्या बोलीभाषेला लाभलेले वेगवेगळे म्हणी-वाक्प्रचार, लोककथा आणि लोकगीतं! असं काही इथे दिसलं-ऐकलं की वेळोवेळी माझं मन मराठीकडे वळायचं, अजुनही वळतं!

या सगळ्यातुन, जर्मन भाषेच्या शिक्षणातुन, इथे रहात असताना हे वेळोवेळी जाणवत गेलं की भाषा हे फक्त संवादाचं साधन किंवा भावना व्यक्त करण्याचं साधन नाही तर आपल्या संस्कृती, इतिहास, मानवी-जीवन, स्वयंपाक आणि खाद्यसंस्कृती, त्या भागात उगवणारी पिकं-झाडं, उमलणारी फुलं, ऋतू, सतत येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, माणसांचे स्वभाव या सगळ्याच्या सगळ्या गोष्टींचा आरसा आहे अक्षरशः! आणि म्हणुनच ती बदलणाऱ्या सामाजिक परिस्थितीमुळे, जीवन-पद्धतीमुळे सतत बदलत असते! सतत प्रवाही असते! हे जसं मराठीच्या बाबतीत होतं तसं जर्मनच्या बाबतीतही होतंच! एवढंच काय, इंग्रजीच्या बाबतीतही होतं! शेक्सपियरच्या काळात बोललं जाणारं इंग्रजी आता कुठं बोलली जातं, नाही का!

जर्मनी मध्ये आल्यापासुन माझ्या आजुबाजुला असंख्य देशांची अगणित माणसं वावरत असतात! प्रत्येकाची वेगवेगळी भाषा! मला नेहेमी मनात येतं की यांच्या सगळ्यांच्या भाषा आपल्याला थोड्याफार जरी शिकता आल्या तर काय बहार येईल! त्या त्या संस्कृतीची निदान थोडीफार तोंडओळख तरी होऊ शकेल! आणि मग वाटतं की भाषा ही माणसाने शोधुन काढलेली कसली सुंदर गोष्ट आहे! पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या भाषांनी माणसाचं आयुष्यं किती रंगी-बेरंगी आणि समृद्ध केलंय! या सगळ्यांमध्ये एक आपली माय मराठी! कितीही भाषा शिकल्या तरी स्वाभाविकपणे ज्या भाषेत मी विचार करेन ती! असं बाहेरुन, त्रयस्थपणे आपल्या भाषेकडे पाहिल्यावर आपली दृष्टीच बदलते आपल्या भाषेकडे पाहायची, नाही का? अधिकच गंमत वाटू लागते मराठी भाषा लिहिता-बोलताना आणि ऐकता-वाचताना- अजुनच आवडायला लागते आपल्यालाच आपली भाषा! 🙂

Advertisements

6 thoughts on “आयुष्य समृद्ध करणाऱ्या भाषा!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s