मॅक्स प्लॅंकचं गाव- ग्योटिंगेन !

खरंतर ग्योटिंगेन हे काही युरोपातलं फार लोकप्रिय किंवा प्रेक्षणीय ठिकाण वगैरे म्हणून प्रसिद्ध असलेलं शहर अजिबात नाही. त्याचा आकार आणि लोकसंख्या पाहता त्याला शहर म्हणावं की नाही हा सुद्धा मला प्रश्न पडतो(हा प्रश्न मला खरंतर जर्मनीतल्या बर्‍याच शहारांकडे पाहून पडतो!). “सिटी ऑफ नॉलेज” किंवा “स्टुडंट सिटी” म्हणून प्रसिद्ध असलेलं हे शहर! १७३४ मधे स्थापन झालेली जगप्रसिद्ध Georgia Augusta University असलेलं शहर, एवढीच काय ती ओळख या शहराची! पण एवढीच ओळख असणं हेच एक वेगळेपण आहे कदाचित या शहराचं! म्हणजे बघा, हायडलबर्ग, फ्रायबर्ग किंवा आमचं डार्मश्टाड्ट ही शहरं सुद्धा जगप्रसिद्ध युनिवर्सिटीज‌ असल्यामुळे “स्टुडंट सिटी” म्हणून जर्मनी मधे प्रसिद्ध आहेत. पण तेवढीच त्यांची ओळख असं मात्रं नाही या शहरांच्या बाबतीत! हायडलबर्गला कॅसल आहे, नेकर नदी आहे; फ्रायबर्ग हे शहर जगप्रसिद्ध ब्लॅक फॉरेस्टच्या परिसरात येतं; किंवा डार्मश्टाड्ट इथे असलेल्या वेगवेगळ्या विज्ञान विषयक उद्योग/इंस्टिट्युट्समुळे ते “सायन्स सिटी” म्हणून प्रसिद्ध आहे. पण ग्योटिंगेनचं तसं नाही.

IMG_20170321_120838

ग्योटिंगेनच्या रेल्वे स्टेशनवर Stadt, die Wissen schafft- the city which creates knowledge!(Picture Credits: Madhura Ketkar)

मी ग्योटिंगेनला शनिवारच्या दिवशी साधारण रात्री ७-८च्या सुमारास पोहोचले. त्या दिवशी तिथल्या युनिवर्सिटीच्या कुठ्ल्याश्या प्रोग्रॅमच्या भारतीय मुलांनी ‘इंडियन नाईट’चा इव्हेंट योजला होता. हा इव्हेंट म्हणे ग्योटिंगेनमधला सगळ्यात मोठा इव्हेंट असतो. बस खचून भरली होती(कधी नव्हे ते!). जर्मनीमधे असा अनुभव फक्त ऑक्टोबर फेस्ट किंवा कार्निवलला किंवा तत्सम सणाला येतो. त्यामुळे अख्खंच्या-अख्खं ग्योटिंगेन त्या इव्हेंटला निघालं आहे असा फील आला होता. मला तर ते पाहून इंदोर शहराची आठवण झाली! इंदोरमधे सुद्धा सकाळी-सकाळी तिथल्या छप्पन बाजारात गेले तेव्हा पूर्ण इंदोर शहर पोहे आणि जिलेबी खातंय असा मला फील आला होता. त्याचीच मला इथे आठवण झाली.
युनिव्हर्सिटी असल्याने शहरात विद्यार्थीच जास्त रहातात. आणि विद्यार्थी नसलेले बाकीचे एकतर शिक्षक किंवा शिक्षण क्षेत्राशी निगडीत नोकरी/व्यवसाय असणारेच आहेत. रविवारी सकाळी माझं ग्योटिंगेन दर्शन तिथल्या युरोपिअन न्युरोसायन्स इंस्टिट्युटने सुरु झालं. माझी मैत्रीण, मधुरा, न्युरोसायंटीस्ट असल्याने त्यांची लॅब मला आतून पाहता आली. जीवशास्त्रात मला कधीच फारसा रस नव्हता, आणि दहावीनंतर या विषयाचा आणि माझा कधी संबंधसुद्धा आला नाही. त्यामुळे अशी पार्श्वभूमी असलेल्या मला ही एवढी मोठी इंस्टिट्युट आतून पहायला मिळणं, त्यांची प्रयोगशाळा पहायला मिळणं हा फार वेगळाच,  एकदम unexpected आणि सदैव लक्षात राहील असा अनुभव होता. ड्रोसोफिलाच्या(फ्रुट फ्लाईज किंवा आपण मराठीत ज्याला चिलटं म्हणतो) न्युरल सिस्टीम आणि त्यांचे व्हिज्युअल रिस्पॉन्सेस यावर मधुरा काम करत्ये. त्यांच्या लॅबमधे किती व्यवस्थित सगळं हाताळलं जातं! ड्रोसोफिला सारख्या इतक्या लहान आणि पटकन कुठेही उडून जाणार्‍या प्राण्याचा कसा अभ्यास करत असेल ही असं पहिल्यांदा ऐकून वाटलं होतं. पण ती लॅब, त्यांचे ते सेट-अप पाहून खरंच डोळे विस्फारले. कदाचित मी कधीही अशा ठिकाणी भारतात सुद्धा गेले नसल्याने, हे फक्त मला आलेलं फिलींग असू शकतं. त्यांची क्लासरूम पहायला मिळाली. गंमतीचा भाग असा की त्याच्या वर्गात एक मोठा सुंदर पियानो ठेवला आहे. अगदी तो वाजवायला सुद्धा मिळाला मला! खरंतर मधुरा बासरी फार सुरेख वाजवते. म्हणूनच आमची खरं म्हणजे ओळख आणि मैत्री झाली होती. पण आत्ता यावेळी आम्ही मेंदु, न्युरोसायन्स आणि त्याच्याशी संबंधित डिसॉर्डर्सबद्दल एवढ्या गप्पा मारल्यात, माझ्या अगदी बाळबोध प्रश्नांची तिने इतक्या सोप्या भाषेत मला उत्तरं दिल्येत! आधी बासरी वाजवणार्‍या मधुराशी मैत्री होती आणि न्युरोसायंटीस्ट मधुराशी फक्त ओळख होती…पण आता या न्युरोसायंटिस्ट मधुराशी सुद्धा मस्त मैत्री झाल्ये! 😀 ग्योटिंगेन ट्रिपमधलं हे ठिकाण आणि तिच्याशी या सगळ्याबद्दल मारलेल्या गप्पा हे खरोखर माझ्याकरता एक हायलाईट होतं.

जर्मनीमधे सार्वजनिक वाहतुक व्यवस्था चांगली आहे. त्यामुळे त्या पूर्ण दिवसाचं तिकीट काढलं की आपण त्या शहरात त्या दिवसापुरतं कितीही आणि कुठूनही कुठेही फिरू शकतो. ते शहर पहायला आलेल्या पर्यटकांसाठी हे फार सोयीचं पडतं. शहराचा मध्यवर्ती भाग हा कुठल्याही जर्मन शहरासारखाच खूप जुनी बांधकामं असलेला, फक्तं पायी चालणार्‍यांकरता असलेला हा भाग. The Navel हा पॉईंट या भागाचा साधारण मध्यबिंदू आहे. पुढे गेल्यावर Gänseliesel हे कारंजं आहे. Gänse म्हणजे goose(बदकाच्या जातीतलाच एक पक्षी)आणि liesel हे एलिझाबेथ या मुलीचं टोपण नाव! या कारंज्याची गंमत अशी की युनिव्हर्सिटी मधे जो कोणी डॉक्टरेट मिळवेल त्याने ह्या कारंज्यावर चढून या मुलीच्या पुतळ्याला kiss करायचं. ग्रॅज्युएशन सेलिब्रेशनचा तो एक महत्वाचा भाग असतो म्हणे! The Navel आणि Gänseliesel हे या शहराचे महत्वाचे landmarks आहेत. शहराच्या या भागात अनेक मोठ्या-मोठ्या वैज्ञानिक, गणिती, तत्वज्ञ यांचे ब्रॉंझचे पुतळे आहेत. त्यातले लिष्टनबर्ग सारख्यांची नावं मी ऐकली होती कधीतरी(Lichtenberg figures शोधणारा हा जर्मनीचा पहिला Experimental physicist हे सुद्धा त्या दिवशी कळलं. जन्माने हा आमच्या डार्मश्टाड्ट्चाच)… बाकीचे बरेच नव्यानेच कळले. काही घरांवर तिथे पुर्वी राहणार्‍या वैज्ञानिक/तत्वज्ञ/संगीतकार/कलाकाराचं नाव आणि त्याची थोडक्यात माहिती असलेले फलक लावलेले होते(मला पुण्यातल्या निलफलकांची आठवण झाली हे पाहून! तसंच होतं हे सुद्धा)

IMG_20170312_130510

Gänseliesel Fountain

IMG_20170312_124002

The Navel

IMG_20170312_133353

लिष्टनबर्गचा ब्रॉन्झचा पुतळा

या सगळ्या माणसांच्या पुतळ्यांना पहात पहात जाताना आम्हाला एकदम समोर एक लोकोमोटिव इंजीनचं मॉडेल दिसलं. हे नक्की काय आहे हे जवळ जाऊन पहात असताना आम्हाला Reinhold Wittig हे नाव त्यावर कुठेतरी कोपर्‍यात लिहिलेलं दिसलं. हा कोण माणूस म्हणून जरा शोध घेतला तर नवीनच माहिती समोर आली. हा माणूस मुळात जिऑलॉजिस्ट आहे. तो वेगवेगळे खेळ डिझाईन करतो, पपेट्स बनवतो आणि खेळवतो. १९८० च्या दशकापासून हा ग्योटिंगेन मधे म्हणे Game Designer Convention भरवतोय. याचा जन्म ग्योटिंगेनला झालाय. हे लोकोमोटिव सुद्धा त्याने बनवलं आहे. अशीच अजून काही त्याच्या खेळांची मॉडेल्स या भागात आहेत.

IMG_20170312_133952

Reinholg Wittig’s Locomotive

मॅक्स प्लॅंकचा प्लॅंक्स कॉन्स्टंट किंवा गॉसचा लॉ मी ११-१२वी पासून वापरत्ये. ओटो हानच्या कामाबद्दलसुद्धा मी शाळेत असतानाच थोडंफार वाचलेलं आहे. पण ही लोकं बराच काळ या शहरात रहात होती आणि त्यांचा मृत्युही याच शहरात झाला आहे हे काही मला माहीत तिथे जाईपर्यंत नव्हतं.(महायुद्धात सगळं उध्वस्त झाल्यामुळे तिथल्या दफनभूमीत मॅक्स प्लॅंक, गॉस यांच थडगं काही सापडत नाही!). अर्थातच त्यामुळे ग्योटिंगेन मधे बर्‍याच मॅक्स प्लँक इंस्टिट्युट्स आहेत. विविध विषयांवर रिसर्च सतत सुरु असतो त्या-त्या इंस्टिट्युट मधे. त्याबरोबरच इतर लोकांकरता वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. उदाहरणार्थ: सोलार सिस्टीम रिसर्च इंस्टिट्युट कधी ग्रहण असेल तर शहरातल्या इतर विद्यार्थी आणि लोकांना त्याबद्दल पूर्ण शास्त्रीय माहिती देते, ग्रहण पहाण्याची व्यवस्था करते. अजून कुठल्या इंस्टिट्युटमधे रिसर्च करणारे विद्यार्थी लहान शाळकरी मुलांकरता वेगवेगळ्या वर्कशॉप्सचं आयोजन करत असतात. वैज्ञानिक प्रयोगांमधून या वैज्ञानिकांकडूनच मुलांना बर्‍याच गोष्टी शिकायला मिळतात. मला इथल्या युनिवर्सिटीजच्या लायब्ररीज किंवा सिटी लायब्ररी पहायला आवडतं. ग्योटिंगेन युनिवर्सिटीची लायब्ररी सुद्धा जर्मनीतल्या इतर लायब्ररीज प्रमाणे प्रचंड मोठी, सर्व सुविधांनी सज्ज अशी. युनिवर्सिटीच्या सगळ्या परिक्षा खरंतर मी गेले तेव्हा नुकत्याच संपल्या होत्या. पण लायब्ररीमधे येऊन उत्साहाने अभ्यास-चर्चा करणार्‍या मंडळींची संख्या बरीच होती. इथल्या सिटी लायब्ररीज हा तर स्वतंत्रपणे लिहिण्याचा विषय आहे. पण इथल्या युनिवर्सिटीजच्या लायब्ररीज सुद्धा अगदी वैशिष्ठ्यपूर्ण असतात. पुस्तकं-त्यांचं विषय वैविध्य, ती ठेवण्याची तसंच पटकन सापडवण्याची विशिष्ठ पद्धत, इंटरनेट-वाय-फाय असलेल्या लॅब्स, पुरेसे लॉकर्स, अगदी एकट्याला बसून अभ्यास करायचा असेल तर असलेल्या खोल्या, ग्रुप डिस्कशन करता असलेल्या वेगळ्या खोल्या, कॅफेटेरियाज, प्रकाश आणि हवा चांगली खेळती… थोडक्यात विद्यार्थ्यांना तिथे येऊन अभ्यास करावासा वाटेल… पुस्तक हाताळावसं वाटेल, घेऊन वाचावसं वाटेल असं सगळं वातावरण सगळ्याच लायब्ररीज मधे असतं.

छोटसं असलं तरी तरूण विद्यार्थ्यांनी भरलेलं, उत्साहाने सळसळणारं आणि येणार्‍या प्रत्येकाला भारावून टाकणारं असं हे ग्योटिंगेन मस्त गाव आहे!

IMG_20170312_123750

ग्योटिंगेनेच्या मध्यवर्ती भागातली एक खूप जुनी इमारत

 

IMG_20170312_123812

St. James Church

 

IMG_20170312_132427

ग्योटिंगेनचा टाऊन हॉल

 

IMG_20170313_093752

भारतात कार किंवा टु-व्हीलर पार्किंग जसं पूर्ण भरलेलं असतं तसं ग्योटिंगेनच्या रेल्वे स्थानकावरचं पूर्ण भरलेलं सायकल पार्किंग

Advertisements

One thought on “मॅक्स प्लॅंकचं गाव- ग्योटिंगेन !

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s