‘ज्युली अँड ज्युलिया’च्या निमित्ताने…

‘ज्युली ऍण्ड ज्युलिया’ या सिनमाचं नाव मध्यंतरी मी कुणाकडून तरी ऐकलं, की Facebookवरच्या कुठल्याशा लेखात अथवा Listमधे वाचलं- नक्की कुठे ते आठवत नाही. त्यानंतर, अगदी casually, एका Weekendला मी हा सिनेमा पाहिला! आणि मला तो फारच आवडला! दोन खर्‍या-खुर्‍या व्यक्तींच्या आयुष्यावर बेतलेला, दोन पुस्तकं आणि एका ब्लॉगवर आधारलेला, एकदम realistic चित्रपट!

Julia Child, फ्रेंच Cook-book लिहिणारी सुप्रसिद्ध अमेरिकन पाककला तज्ञ, एकदम प्रसन्न आणि हसरं व्यक्तिमत्व. (Meryl Streep ने फार सुरेख काम केलय ज्युलियाचं!). Julie Powell, Lower Manhattan Development Corporation(LMDC) मधे Mid-level bureaucrat असलेली बाई. या वेगवेगळ्या काळातल्या आणि वेगवेगळ्या background असलेल्या दोन बायकांची ही एक खरीखुरी गोष्ट.

सिनेमा चालू होताच आपल्याला १९४९ चा फ्रान्स आणि तिथे नुकत्याच आलेल्या ज्युलिया आणि पॉल या जोडप्याचा आपापसात बोलतानाचा आवाज ऐकू येतो. गाडीतून दोघंही फ्रान्स मधल्या आपल्या नव्या घराकडे जात असतात आणि पॉल एकीकडे ज्युलियाला फ्रेंच शिकवण्याचे प्रयत्नं करत असतो. मुळात कलेची जाण असलेल्या आणि खवैय्ये असलेल्या या जोडप्याला फ्रान्स आपल्या प्रेमात पाडतो. इकडे २००२ सालात ज्युली पॉवेल काहीश्या अनिच्छेनेच आपला नवरा, एरिक बरोबर ब्रूकलीन मधून क्वीन्स, न्यु योर्कला Shift होत असते. गाडीत तिचा नवरा- आपल्याला क्वीन्स आवडेल, काळजी करू नकोस- अशी हमी देत असतो. हे दोन्ही पाहिल्यावर संपूर्ण सिनेमामधे आपण मस्त Time-travel करणार आहोत हे आपल्याला लक्षात यायला लागतं.

आधी शासकीय कर्मचारी असलेल्या ज्युलियाला फ्रान्समधे आल्यावर पुन्हा शासकीय सेवेत रुजू व्हायची मुळीच इच्छा नसते. पण दिवसभर घरी मात्र बसायचं नसतं. पण काय करावं हे मात्रं गवसत नसतं. Hat making classला जाऊन पहाते, bridge lessons घ्यायला जाते. पण या कशातच मन रमत नसतं. फ्रेंच-फूडची फॅन असलेल्या ज्युलियाला एक गोष्ट मात्र लक्षात येते की फ्रेंच पाककला शिकण्याकरता एकही इंग्लिश मधलं पुस्तक अस्तित्वात नाही. फ्रेंच पाककलेच्या प्रेमापोटी ती शेवटी Le Cordon Bleu नावाच्या अत्यंत नावाजलेल्या आणि जिथे फक्त Professional chefs शिकतात अशा क्लासमधे शिकायला सुरुवात करते. जिद्दीने तो डिप्लोमाचा अभ्यासक्रम पूर्ण करते. हे सगळं करत असतानाच पॅरिस मधे रहाणार्‍या अमेरिकन्ससाठी ती तिचा स्वत:चा Cooking class सुरू करते. Louisette Bertholle आणि Simone Beck या एक कुक-बुक लिहिणार्‍या तिच्या मैत्रिणी. एके दिवशी त्या- तु पुस्तक लिखाणात आम्हाला collaborate करशील का?- असा प्रस्ताव तिच्यासमोर ठेवतात. आणि तेव्हा सुरु होतो Mastering the Art of French Cooking या अत्यंत celebrated पुस्तकाचा लिखाण प्रवास.

julia_child_at_kuht

तिच्या किचन मधली ज्युलिया (Source: Google)

3805838813_afa81c59ca

मेरिल स्ट्रीप ज्युलियाच्या भुमिकेत

इकडे २००२ सालात रोजच्या रटाळ कामाला प्रचंड कंटाळलेली, आणि एक अयशस्वी लेखिका म्हणून शिक्का मारला गेलेली- ज्युली. एकीकडे आपापल्या क्षेत्रात खूप प्रगती करणार्‍या तिच्या मैत्रिणी आणि दुसरीकडे frustrate झालेली ज्युली. आता पहा, आज आपण असंख्य ब्लॉग्स वाचत असतो, फॉलो करतो किंवा बर्‍याचशा हौशी आणि प्रस्थापित लेखकांचे आज ब्लॉग्स असतात. पण २००२ साली ब्लॉग हा एक नवा concept होता. वैतागलेल्या ज्युलीला तिचा नवरा ब्लॉग सुरु करण्याचं प्रोत्साहन देतो. तिच्यात दडलेली आणि प्रकाशकाने ‘नाही’ म्हणल्यामुळे दबली गेलेली लेखिका पुन्हा लिहिती करण्याचा हा नवा रस्ता असतो. पण ब्लॉग नक्की लिहायचा कशावर? लिखाणाचा विषय तिच्या आवडीचा असावा. लिखाणाला काहीतरी शिस्त असायला हवी! रोजच्या Hectic आणि uncertain दिवसानंतर तिला सगळ्यात ताजं करणारी आणि तिचा मूड नोर्मल करणारी एकच गोष्ट म्हणजे अर्थातच स्वयंपाक! ती तिच्या नवर्‍याशी गप्पा मारतानाचा एक फार छान dialogue आहे- “You know what I love about cooking? I love that after a day when nothing is sure, you can come home and absolutely know that if you add egg yolks to chocolate and sugar and milk, it will get thick. It’s such a comfort.” मग ठरतं- ‘स्वयंपाक’ या विषयावर ब्लॉग लिहायचा. तिच्याकडे असलेलं Julia Child च्या Mastering the Art of French Cooking या पुस्तकातून एक-एक करून सगळे पदार्थ बनवायचे आणि त्या विषयीच ब्लॉग लिहायचा. हो, पण एवढं सहज नसतं ते. त्या पुस्तकातल्या ५२४ पाककृती(recipes) एका वर्षात-म्हणजे ३६५ दिवसांत पूर्ण करायच्या असं हे challenge ती स्वत:च स्वत:ला देते. The Julie/Julia Project हे त्या ब्लॉगचं नाव. आणि पुन्हा ते ब्लॉग स्वरूपात आख्ख्या जगासमोर जाहीर होणार असतं. त्यामुळे ‘केलं तर केलं- आणि नाही केलं तरी कोण विचारतंय’ असला प्रकार नसतो. संसार, पूर्ण वेळ नोकरी आणि तिची पाळलेली मांजर हे सगळं सांभाळून हे करणं खरोखर एक आव्हान असतं. My Life in France आणि Mastering the Art of French Cooking या दोन पुस्तकातून ज्युलीला हळूहळू ज्युलिया आणि तिचं आयुष्य उलगडू लागतं. हे सगळं करताना, वाचताना, ब्लॉग लिहिताना तिच्या मनात तिने ज्युलियाची एक छान प्रतिमा तयार केलेली असते. ज्युलिया तिची Imaginary friend झालेली असते. अक्षरश: ती obsessed झालेली असते असं म्हणलं तरी चालेल.

4254705917_116cec91a1_o

ज्युली पॉवेल (Source: Google)

ज्युलिया आणि ज्युली दोघींनाही हे सगळं करताना असंख्य अडचणींना सामोरं जावं लागतंच. ते कुणाला चुकलंय म्हणा! मधे-मधे विघ्न आणणारे, discourage करणारे असतातच. ज्युलियाच्या बाबतीत कधी प्रकाशक नाकारतो, कधी तिघी लेखिकांमधे मतभेद होतात. त्यात फ्रान्स, जर्मनी, स्वीडन, यु.एस अश्या होणार्‍या नवर्‍याच्या बदल्या. त्याच्या करियर मधले चढ-उतार. तब्बल आठ-नऊ वर्ष हे काम चाललेलं असतं. ज्युलीच्या बाबतीत घर-ऑफीस अशी ओढाताण, कधी कधी फसणारे पदार्थ, आणि deadline असल्यामुळे डोक्यावर असलेला ताण. पण दोघींच्याही सुदैवाने त्यांना अपापल्या नवर्‍यांची खंबीर साथ असते. Discourage करणारे असतात तसे encourage करणारेही मित्र-मैत्रिणी असतात.

या ब्लॉगमधे मी काही सगळी गोष्ट सांगत नाही. ज्युलियाचं पुस्तक शेवटी कोण आणि कसं प्रकाशित करतं, पुढे त्यांचं काय होतं, ज्युलीचं एक वर्षाचं हे Project पूर्ण होतं की होत नाही? ज्युलीच्या ह्या ब्लॉगबद्दल ज्युलियाला कळतं का? त्या दोघींची कधी प्रत्यक्ष भेट होते का? चित्रपट पाहिल्यावर या सगळ्या गोष्टी कळतीलंच. किंवा पाहिला असेल तर माहितही असतील. पण हो, चित्रपटाचा शेवट एकदम realistic आहे एवढं मात्र नक्की सांगते. कारण मला हा चित्रपट आवडण्याच्या अनेक कारणांपैकी ते एक कारण आहे. त्यात Cinematic liberty च्या नावाखाली कुठलाही प्रसंग, किंवा व्यक्तीला glorify केलेलं नाही, असं माझं मत आहे. जसं घडलं तसंच सगळं दाखवलेलं आहे. (ज्युली पॉवेलच्या २००२-०३ मधल्या मूळ ब्लॉगचा archive इथे वाचायला मिळतो)

चित्रपटातली आणखी एक गमतीची गोष्ट म्हणजे- फ्रेंच खाद्यसंस्कृती, त्यांचे वेगवेगळे पदार्थं. ज्युली आणि ज्युलियाला स्वयंपाक करताना आणि खाताना-खिलवताना पाहून आपल्यालाच भूक लागते! त्या फ्रेंच पदार्थांची नावं सुद्धा- बूफ बर्गीनियॉं (boeuf bourguignon), हॉलंडेज्‌(hollandaise) सॉस, कॅसोले(cassoulet), ब्री(Brie), ब्येर ब्लॉं (beurre blanc)- असली नाजुक-साजुक! बूफ बर्गीनियॉं- हा शब्दच ऐकायला इतका सुंदर वाटतो या चित्रपटात! मी बीफ खात नाही म्हणून, नाहीतर हा पदार्थ करून, खाऊन पहाण्याची सुद्धा माझी तयारी होती- इतका मला त्या शब्दाचा sound आवडला होता! गंमत सोडून देऊ, पण खाद्यसंस्कृती, खाद्यपदार्थ आणि पाककलेशी निगडीत दृश्य असलेल्या मोजक्या चित्रपटांपैकी हा एक आहे.

हा Movie पहाण्याच्या आधी मला Julia Child बद्दल काडीचीही माहिती नव्हती. पण Movie पाहिल्यावर, आणि नंतर उत्सुकता म्हणून थोडासा शोध घेतल्यावर, ही बाई केवढी लोकप्रिय आहे हे जाणवलं. खरोखर ज्युलीने तिच्या ब्लॉगमधे म्हणल्याप्रमाणे-The lady who taught America to cook, and to eat. प्रत्येक अमेरिकन स्वयंपाकघरात सापडणारं पुस्तक लिहिणारी ही बाई. A book for serventless American Kitchens हा पुस्तकाचा motto सार्थ करणारी. अमेरिकेच्या सुप्रसिद्ध आणि प्रचंड मोठ्या स्मिथसोनिअन-दि नॅशनल म्युजियम ऑफ अमेरिकन हिस्टरी मधे ज्युलियाचं Cambridge, Massachusetts मधलं किचन-तिनं वापरलेली सगळी भांडी, उपकरणं, टेबल्स, कुक-बुक्स यांच्या सकट लोकांना पहाण्याकरता ठेवलेलं आहे.(याबद्दल अधिक माहिती इथे).सहाजिकच, या पुढे मनात आलेला विचार- आपल्या मराठीत हे असं इतकं methodically लिहिलेलं पुस्तक कोणतं बरं? मराठीत अनेक चांगली कुक-बुक्स आहेत. पण गेली जवळ-जवळ ४०-५० वर्ष महाराष्ट्रातल्याच काय, पण परदेशातल्या सुद्धा मराठी स्वयंपाकघरांमधे सापडणारं पुस्तक म्हणजे कमलाबाई ओगल्यांचं ‘रुचिरा’. माझी आई/मावशी किंवा त्यांच्या पिढीतल्या सगळ्याजणींच्या स्वयंपाकघरात वापरलं जाणारं हे पुस्तक! अर्थात अमेरिकेमधे त्यावेळी फक्त Packed foodची चलती होती, त्यामुळे ज्युलियाने फ्रेंच खाद्यसंस्कृती अमेरिकन्स समोर आणली, पण आपलं तसं नाहीये ना! कमलाबाई ओगल्यांनी ६५२ महाराष्ट्रीयन पाककृती त्यांच्या पुस्तकात दिल्या आहेत. आता त्या पुस्तकाविषयी माझ्यासारख्या मुलीने अजून काही लिहिणं आणि ते आई/आजी किंवा स्वयंपाकघर सांभाळणार्‍या कुठल्याही बाईला वाचायला लावणं म्हणजे निव्वळ माझा वेडेपणा ठरेल. पण एक नुकतीच समजलेली छान गोष्ट मला सांगायची आहे! कमलाबाई ओगले जशा मराठी ज्युलिया आहेत तशीच मला मराठी ज्युली ही सापडली. रिडिंग, युके मधे रहाणार्‍या प्रिती देव! त्या स्वत: Special needs educator आहेत. त्यांचा ‘Ruchira Videshini’ नावाचा मस्त ब्लॉग आहे. ‘रुचिरा’ मधला एक-एक पदार्थ बनवून त्याचे फोटो ब्लॉगवर त्यांनी टाकले आहेत. ‘रुचिरा’ पुस्तकातून काही वेगळी स्पेशल रेसिपी केली असेल तर त्याविषयी त्या ब्लॉगवर लिहितात सुद्धा. चांगल्या फूड फोटोग्राफीमुळे ब्लॉग फार सुंदर आणि attractive झाला आहे! येत्या ईस्टरमधे ‘Ruchira Videshini’ पूर्ण होणार आहे. गंमत म्हणजे ‘Ruchira Videshini’ सुरू केलं तेव्हा प्रिती देव यांना ज्युली आणि ज्युलिया बद्दल आणि त्या Projectशी असलेल्या साधर्म्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. एका पत्रकाराने त्यांच्या ‘Ruchira Videshini’ आणि Julie/Julia Project मधे असलेल्या सारखेपणा त्यांच्या लक्षात आणून दिला. यु.के. मधे shift झाल्यावर त्यांना खर्‍या अर्थाने घरी मराठी पद्धतीचा स्वयंपाक करण्याची गरज भासू लागली. (परदेशात आपल्याला बाहेरचं खायला फार scope नसतो आणि फारसं चविष्ट कुठे खायला सुद्धा मिळत नाही. घरच्या मराठी पद्धतीच्या जेवणाची सवय असल्याने आपण फार काळ परदेशी खाद्यसंस्कृतीतले पदार्थ खाऊ सुद्धा शकत नाही. हे मी स्वानुभवावरून सांगत्ये!) तेव्हा प्रितीताईंनी पहिल्यांदा ‘रुचिरा’ उघडलं. पण पुन्हा हे एवढं सगळं सुरळीत नव्हतं. यु.के. मधे किंवा खरंतर परदेशात कुठेही आपल्याकडच्या सगळ्या भाज्या मिळत नाहीत. पालेभाज्या मिळणं तर फारच कठिण असतं. त्यामुळे काही पदार्थ करता आले नाहीत. सतत असलेल्या पावसामुळे वाळवणीचे पदार्थ करायला सुद्धा limitations आली. खूप planning करून त्यांनी बरेच पदार्थ केले. काही पदार्थांच्या allergy मुळे ते drop करायला लागले. हे असून सुद्धा त्यांनी ३०-४० Categories निवडल्या आणि प्रत्येक Category मधे १५-२० recipes आहेत. आम्ही बोललो त्याच्या दुसर्‍या दिवशी त्यांना काही उसर्‍या(Sun-dried vegetables) मिळणार होत्या. त्यामुळे त्यांचे पालेभाज्यांचे प्रकार पूर्ण होणार होते! त्यांनी त्यांच्या ब्लॉगवर आणि ब्लॉगच्या फेसबूक पेजवर मध्यंतरी त्यांचा प्लॅन, Categories, recipes पोस्ट केल्या होत्या. त्यावरून त्यांचं हे सगळं काम किती organised आणि planned आहे आणि त्या हे सगळं किती मन लावून करत आहेत हे लक्षात येतं.

(प्रीती देव यांच्या ‘Ruchira Videshini’ या ब्लॉगची लिंक इथे)
(प्रीती देव यांच्या ‘Ruchira Videshini’ या फेसबूक पेजची लिंक इथे)

kamalabai-ogale-1

कमलाबाई ओगले (Image Source: Google)

17124794_1446849602013449_1795914859_n

प्रीती देव (Image Source: Preeti Deo)

भारतात काय किंवा बाहेर पाश्चिमात्य देशात काय, in general स्वयंपाकघर हा घराचा खूप महत्वाचा भाग आहेच. मग त्यात काम करणारं कोणीही असो- बाई/पुरुष किंवा दोघंही. भारतामधे/महाराष्ट्रामधे, रोजच्या जेवणाचे पदार्थ किंवा आजची शहरातली सगळ्यांची जीवनशैली पाहता युरोपियन किंवा अमेरिकन kitchen सारखं संपूर्णपणे Serventless kitchen तितकसं practical नक्कीच नाही. पण तरी मध्यमवर्गीय घरांमधे बराचसा स्वयंपाक घरातली व्यक्तीच करते किंवा आपल्या देखरेखीखाली करून घेते. थोडक्यात काय, प्रत्येक संस्कृतीत लोकं असे स्वयंपाकघरातले वेगवेगळे प्रयोग करत असतात. प्रत्येकाचं करण्याचं प्रयोजन त्याच्या परिस्थिती प्रमाणे थोड्याफार फरकाने बदलत असेल कदाचित. फक्त फरक एवढाच आहे की आळुची भाजी, वरण भात किंवा बटाट्याच्या काचर्‍या या सगळ्याला Crêpes किंवा chocolate mousse किंवा pasta, spaghetti इतकं glamour नाहिये. (आपणंच जर उकडीचे मोदक या पदार्थाची स्वीट मोमोज्‌/ इंडियन मोमोज्‌ अशी ओळख करून द्यायला लागलो तर कसं चालेल! मग तसं जर करत असू तर आपण पास्ता ह्या प्रकाराला इटालियन शेंगोळे किंवा इटालियन वरणफळं असं का म्हणू नये ना!? ). किंवा हॉटेलमधे/फूड जॉईंट्सवर जाऊन continental dishes खाण्याइतकं घरी केलेल्या मेथीची लसणाची फोडणी घातलेली भाजी, मऊसूत पोळ्या, काकडीची कोशिंबीर, कारळाची किंवा जवसाची चटणी, टोमॅटोचं सार, आमटी भात, ताक या सगळ्याला आपल्याकडेच glamour नाही. मग बाहेरचं काय विचारता. कॉकटेल्स-मॉकटेल्स इतकं कोकम-पन्हं-ऊसाच्या रसाला glamour नाही. नाहीतर ज्युलिया चाईल्ड इतकीच आणि तेवढ्याच मोठ्या पातळीवर कमलाबाई ओगले यांच्या कामाची नोंद झाली असती. विक्रमी पुस्तकविक्री आणि ‘रुचिरा’चं इंग्रजीत झालेलं भाषांतर या व्यतिरिक्त ज्युलिया सारखं अजून जास्त काहीतरी त्या सुद्धा deserve करतात. किंवा आज भारतातल्या घरांमधेही (सगळ्या घटक पदार्थांची availability आणि suitable हवामान असून सुद्धा) जेव्हा बरेच मराठी पदार्थं बनवले जात नाहीत किंवा माहितही नसतात तेव्हा तिथे इंग्लंड मधे हे सगळे पदार्थ करणार्‍या प्रीती देव यांचं सुद्धा ज्युली पॉवेल इतकंच कौतुक झालं असतं. आणि याहीपुढे जाऊन-आपण जसं इटालीयन, मेक्सिकन, चायनिज्‌, फ्रेंच इत्यादी इत्यादी पदार्थं आवडीने खातो तसं परदेशातल्या माणसानेही मिसळीवर आडवा हात मारला असता. साबुदाण्याच्या खिचडीवर ताजं ओलं खोबरं आणि कोथिंबीर नाही म्हणून हॉटेलला negative feedback दिला असता. आपण जसं पिझ्झावर वेगवेगळ्या टॉपिंग्सची ऑर्डर करतो तसं त्याने भाकरी किंवा थालिपीठावर ताज्या लोण्याच्या गोळ्याची मागणी केली असती! हे सगळं नक्की होईल कधीतरी, पण तूर्तास स्वप्नरंजनातच रमणे आपल्या हातात आहे!

Advertisements

8 thoughts on “‘ज्युली अँड ज्युलिया’च्या निमित्ताने…

 1. Preeti Deo says:

  Mrunmayi, such a sweet post! You writing conveys how naturally you feel about food. It certainly is a part of your soul.
  You have put forth my thoughts about Marathi cuisine when it will served globally just the way you have mentioned ! Oh! For the day!! Thank you so much my dear! You have made my day. Motivates me to reach my target!

  Liked by 1 person

 2. Preeti Chhatre says:

  खूप छान लिहिलंय. अतिशय आवडलं.
  (तुमची जर्मन नद्यांवरची ब्लॉग-पोस्टही खूप आवडली होती.)

  Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s