भेट जर्मन नद्यांची!

मला, का कोण जाणे, पण कुठल्याही नदीचं फार attraction वाटतं नेहेमीच! मी ज्या शहरात वाढले, त्या नाशिकमधे, तिथल्या लोकांना गोदावरीचं फार कौतुक आहे. गोदावरीवर प्रचंड प्रेम करतात नाशिककर (आणि अर्थात मी सुद्धा). रात्रीच्या वेळी गोदावरीच्या घाटांवर चक्कर मारायला जाणं हे तसं common आहे. किंवा भाजी-फळं-फुलांची खरेदी बरेच नाशिककर तिथूनच करतात. कदाचित यामुळे असेल. पण मला नदीचं फार attraction आहे हे मात्र खरं. नदीपाशी गेलं की मला- आपण कुठल्यातरी वयाने खूप मोठ्या आणि खूप अनुभवी व्यक्तीच्या जवळ आहोत-असं एक feeling असतं. या नदीने बदलत गेलेली संस्कृती, माणसाची हळुहळू होत असलेली प्रगती किती जवळून पाहिली असेल नाही? म्हणजे जगातल्या पहिल्या काही संस्कृती जिथे निर्माण झाल्या त्या नाईल, सिंधू सारख्या नद्यांनी तर केवढं काय-काय पाहिलं असेल. आताच्या माणसाकडे पाहून कदाचित त्यांना गंमत वाटत असेल. किंवा कदाचित वैषम्य सुद्धा वाटत असेल- माणसाच्या वाढलेल्या गरजा, प्रदुषण आणि materialism पाहून! आपल्याकडच्या नर्मदेसारख्या नदीने कितीतरी परिक्रमावासी पाहिले असतील. अहिल्याबाई होळकरांसारखी शूर आणि हुशार राज्यकर्ती स्त्री पाहिली असेल. बाजीराव पेशव्यांचा भर उन्हाळ्यात झालेला मृत्यु पाहिला असेल. आपल्याकडच्या भीमा,क्रिष्णा, कोयना, पवना, इंद्रायणी यांनी प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना, ज्ञानेश्वर-तुकोबांना पहिले असेल कदाचित. गंगा-यमुना-क्षिप्रेने कितीतरी विद्वान-पंडितांना पाहिलं असेल. या सगळ्यांना जर वाच्या फुटली तर कितीतरी गोष्टी त्या आपल्याला ऐकवतील, नव्हे- त्यांच्यावर बांधले गेलेले घाट, काठाशी बांधलेली मंदीरं, देवालयं, समाध्या, तसंच त्यांचे बदलणारे प्रवाह यावरून आपल्या कळत -नकळत अनेक references, hints, खुणा त्या already दाखवत आहेत आपल्याला! म्हणजे खरंतर त्यांना flowing story-tellers म्हटलं तरी काही वावगं ठरू नये!

जर्मनीमधे येऊन आता मला दिड वर्ष होईल. या काळात मी जमेल तसं बरंच जर्मनी हिंडले. अर्थातच मी जिथे जायचे तिथे तिथल्या नदीची भेट ठरलेलीच असायची! र्‍हाईन, नेकर, माईन सारख्या नद्यांवर, किंवा त्यांच्या आसपास मला खूप वेळ घालवता आला. इथल्या नद्यांची वेगळीच कहाणी. रोमन राज्यकर्त्यांपासून कायझर विल्हेम, हिटलर, पहिलं-दुसरं महायुद्धं आणि त्यानंतरचं पूर्व-पश्चिम असं वेगळं झालेलं जर्मनी, ते आताचं पुन्हा एकत्रं नांदणारं जर्मनी असा सगळा त्यांच्या डोळ्यांदेखत घडलेला प्रवास!

फ्रांकफूर्टची माईन नदी

मी राहत्ये त्या डार्मश्टाड्ट(Darmstadt) शहरापासून जगप्रसिद्ध फ्रांकफूर्ट हे शहर जेमतेम अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. खरंतर, या शहराचं नाव नुसतं फ्रांकफूर्ट नसून ’फ्रांकफुर्ट आम माईन’(Frankfurt am Main) असं आहे. म्हणजे ’माईन नदीवरचं फ्रांकफूर्ट’. बर्‍याच लोकांना हे माहित नसतं, पण जर्मनीच्या पुर्वेला अजून एक फ्रांकफूर्ट नावाचं शहर आहे! आणि ते ओडेर(Oder) नदीच्या किनारी आहे! म्हणून त्याचं नाव Frankfurt an der Oder (फ्रांकफूर्ट आन देर ओडेर) असं आहे! काय गंमत आहे नाही! दोन एकाच नावाची आणि एकाच देशातली शहरं तिथे वाहणार्‍या नदीच्या नावांवरून वेगवेगळी ओळखली जातात! ’फुर्ट’ म्हणजे जिथे नदी उथळ होते आणि पायी सुद्धा cross करता येऊ शकते तो भाग. आणि Frank ही म्हणे जर्मनीमधली एक जमात होती. त्यावरून हे नाव पडलं असं म्हटलं जातं. १९व्या शतकात हे नाव officially या शहराकरता घेतलं गेलं म्हणे. फ्रांकफूर्टमधला माईन नदीवरचा लोखंडी पूल हा जवळजवळ १०० वर्ष जुना आहे! जर्मनी मधे माझ्या आवडत्या ठिकाणांपैकी तो एक! फ्रांकफूर्टच्या Hauptbahnhof (मुख्य रेल्वे स्थानक) पासून अगदी चालत जायच्या अंतरावर असलेला! या पुलावर फक्त पायी चालणारी मंडळी आणि सायकलस्वार यांनाच प्रवेश आहे. त्यामुळे फ्रांकफूर्टच्या रस्त्यावरचा गजबजाट इथे जाणवत नाही! पुलाखालून संथ शांतपणे वाहत जाणारी नदी.. अधून-मधून जाणार्‍या क्रुझ सारख्या मोठाल्या बोटी.. उन्हाळ्यात त्याच्या डेकवर ऊन खात बसलेली माणसं… पुलावरून दिसणारी फ्रांकफूर्टची प्रसिद्ध, डोळे दिपवून टाकणारी Sky Line… आणि त्याचबरोबर दिसणारी जुन्या पद्धतीची Museums आणि art galleries. या सगळ्याचा अनुभव घेतला, फोटो-बिटो, सेल्फी-बिल्फी काढून झाले की आपोआपच आपले पाय पुलाच्या पायर्‍या उतरतात! नदीच्या दोन्ही बाजुने वाढवलेली हिरवळ आणि पायी चालण्यासाठी तयार केलेला आखिव-रेखिव रस्ता यांनी पुलावरूनच आपल्याला भुरळ घातलेली असते! आपल्याला काही कळायच्या आत आपण त्या रस्त्यावरून नदीच्या काठाकाठाने चालायलाही लागलेलो असतो! तिथे एखाद्या झाडाखाली कुणी एखादा गात असतो…कोणी पुस्तक वाचत बसलेलं असतं… कोणी अभ्यास करत असतं. कोणी सायकलस्वार मस्त गाणी ऐकत सायकल चालवत जातो, काही लोक jogging करत असतात. अधूनमधून नदीच्या पाण्यातली बदकं तीरावर येत असतात. हा नदीकिनारचा फेरफटका आपल्याला एकदम ताजंतवानं करून टाकतो.

जर्मनीमधे मी अनेक पुलांवर पहिलं-पुलावरच्या लोखंडी सळ्या किंवा गजांमधे प्रेमिकांनी आपलं नाव किंवा नावाची आद्याक्षरं असलेली अनेक कुलुपं(Love Locks) अडकवलेली दिसतात! बहुदा ही प्रथा पूर्ण युरोपातच असावी! अगदी छोट्यातल्या छोट्या पुलावर सुद्धा जेव्हा एखाद-दुसरं कुलूप अडकवलेलं दिसतं तेव्हा खरंच गंमत वाटते लोकांची! पण भिंतींवर नावं लिहिण्यापेक्षा हे बरं असं सुद्धा वाटून जातं! अशी अनेक कुलुपं या पुलावर दिसतात!

img_20161228_090157

माईन नदीवरचा लोखंडी पूल

12243467_1014684565220300_7728266900679124327_n

पुलावरून दिसणारी नदी. Autumn Season मधे काढलेला फोटो असल्याने झाडांचे-पानांचे वेगवेगळे रंग आणि पानगळ झालेली दिसत आहे

र्‍हाईन नदी

ही युरोपातली प्रचंड मोठी नदी! युरोपातल्या ६ देशांमधून वाहणारी! आणि गंमत म्हणजे आपल्या ब्रम्हपुत्रेसारखी या ६ देशांच्या वेगवेगळ्या भाषांमधे वेगवेगळ्या नावाने ओळखली जाणारी!
र्‍हाईन नदी मी दोन ठिकाणी पाहिल्ये आत्तापर्यंत! माइन्झला आणि बॉनला!

 माइन्झ हे एक तसं typical जर्मन गाव! Rhineland Pfalz(जर्मन नाव) किंवा Rhineland Palatinate(इंग्रजी नाव) या राज्याची राजधानी! र्‍हाईन नदी आणि त्याबरोबरच इतर भौगोलिक आणि नैसर्गिक कारणामुळे हा भाग द्राक्ष लागवड आणि अर्थातच-त्यानंतरचं द्राक्ष्याचं रूप म्हणजे-वाईन उत्पादनासाठी प्रसिद्ध! युरोपात रोमन साम्राज्याच्या इतिहासापासून फार महत्वाचं स्थान असलेलं हे गाव! काळाप्रमाणे या गावाची नावं सुद्धा बदलत गेलेली. तिथे वाहणार्‍या र्‍हाईन नदीने हा सगळा इतिहास पाहिलाय! त्या त्या गावाचं त्या नदीशी कसं छान नातं असतं पहा ना!- खूप-खूप पुर्वी म्हणे या परिसरात काही माणसांचा असाच एक समुह अन्न आणि पाण्याकरता भटकत होता. पण दुर्दैवाने गावाच्या/माणसांच्या वस्तीकडे जाणारा एकही रस्ता त्यांना न सापडल्यामुळे ही लोकं भूकबळीने मरण पावली! हे लक्षात येताच, यावर उपाय म्हणून इथल्या लोकांनी रस्त्यांच्या नावांच्या पाट्या एका विशिष्ट प्रकारे लिहिल्या, जेणेकरून गावातल्याच किंवा गावात नव्या आलेल्या माणसाला पटकन दिशेचा अंदाज यावा! ज्या रस्त्यांची नावं निळ्या पाटीवर लिहिली आहेत ते रस्ते र्‍हाईन नदीच्या समांतर(parallel) धावतात तर लाल पाटी असलेले रस्ते नदीच्या प्रवाहाच्या काटकोनात(perpendicular) धावतात! आणि आजही माइन्झमधे दिशादर्शकासाठी हीच पद्धत वापरली जाते! आहे की नाही गंमत! लोकांना रस्ता सापडणं सोपं जावं म्हणून नदीची मदत घेऊन कसला भन्नाट protocol तयार केला आहे!

photogrid_1484523119356

माईन्झमधल्या रस्त्यावरचा नदीप्रवाहाचा उपयोग करून तयार केलेला protocol

बॉन मधल्या र्‍हाईनपेक्षा बॉनकडे जाणार्‍या रस्त्यावरची र्‍हाईन मला जास्त आवडली. बॉनला मी डार्मश्टड्टपासून ट्रेननी गेले होते. जवळ-जवळ अर्धा अधिक रस्ता ही र्‍हाईन आपल्या बरोबर प्रवास करते! र्‍हाईनचा प्रवाह आणि ट्रेनचा route हा समांतर असल्याने जवळ-जवळ संपूर्ण रस्ता म्हणजे अक्षरश: नेत्रसुख असतं! ते नदीचं निळंशार पाणी, काठा-काठाने असलेली हिरवीगार झाडं, मधूनंच दिसणारं एखाद-दुसरं टुमदार घर, कधी मधूनच येणारे खडकाळ डोंगर! मग हे सगळं पहाताना अश्याच एखाद्या र्‍हाईनच्या काठच्या टुमदार घरात राहण्याची स्वप्नही आपण आपल्या नकळत पहायला लागतो! किंवा फिरायची, ट्रेकिंगची, सायकलींगची आवड असलेला एखादा-एकदातरी पायी किंवा सायकलवर हा पूर्ण प्रदेश पालथा घालायचा-असं मनोमन ठरवतो.

img_4682

बॉनमधली र्‍हाईन नदी (Photo Credits: Nikhil Godse)

हे सगळं मनात चाललेलं असतानाच नदीच्या पलिकडे दिसणार्‍या डोंगर रांगांमधे आपल्याला ’लॉरलाय’(Lorelei) नावाचा एक प्रचंड मोठा सुळका दिसतो! या लॉरलायबद्दल जर्मन जनमानसांत अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. लॉरलाय ही एक खूप सुंदर दिसणारी, सोनेरी केसांची आणि गोड गळ्याची मुलगी ही खरंतर र्‍हाईन नदीची मुलगी आहे(Vater Rhein-फाटर र्‍हाईन-Father Rhine: आपल्या देशात जसं आपण नदीला आई म्हणतो, उदा: गंगामैया, नर्मदामैया किंवा गोदामाई तसं जर्मनीमधे र्‍हाईन या सगळ्यात मोठ्या नदीला वडिल म्हणून संबोधतात). ती त्या सुळक्यावर बसून र्‍हाईन नदीतून नावेतून प्रवास करणार्‍या नावाड्यांना आपल्या रुपाने आणि गाण्याने भुलवते! या सगळ्यामधे नावड्यांचा आपल्या नावेवरचा ताबा सुटतो आणि नाव एखाद्या सुळक्यावर/खडकावर आपटून पाण्यात बुडते! अशी एक दंतकथा प्रसिद्ध आहे! कदाचित पुर्वीच्या काळी त्या सुळक्यापाशी नदीप्रवाह नागमोडी आणि अरूंद होत असावा, आणि पुरेश्या साधन-सामग्री अभावी नावड्याचा नावेवरचा ताबा रहाणं कठिण होत असावं! या सगळ्याला एक अतिगुढ-गोष्टीरूप देणं हा माणसाचा स्वभावधर्म आहे, त्यामुळे या कथा निर्माण झाल्या असाव्यात! या दंतकथेवरच हाईनरिश हाईनऽ(Heinrich Heine) नावाच्या सुप्रसिद्ध जर्मन कवीने लिहिलेली Die Lorelei (दि लॉरलाय) नावाची एक छान कविता जर्मन साहित्यात खुप प्रसिद्ध आहे! युट्युब किंवा गुगलवर ही कविता आणि त्याचं इंग्रजी भाषांतरही उपलब्ध आहे!

Lorelei Song(in German)

The Lorelei Song (with meaning in different languages)

हायडलबर्गची नेकर(Neckar)

हायडलबर्ग आणि नेकरबद्दल तर काय बोलावं! सगळंच स्वप्नवत! आयुष्यात कधीतरी या शहरात जायचं हे स्वप्नं मी अगदी शाळेत असल्यापासून उराशी बाळगून होते! दुसर्‍या महायुद्धात जाणून बुजून कुठल्याही राष्ट्राने या शहरावर बॉम्बहल्ला घडवून आणला नाही केवळ इथलं प्रचंड जुनं, जगातल्या पहिल्या काही विद्यापीठांमधलं एक विद्यापीठ आणि इथल्या सुंदर कॅसलची वाताहात होऊ नये म्हणून! शहरात रेल्वेने पोचल्यावर कॉर्नमार्क्ट(Kornmarkt) नावाचा एक मध्यवर्ती म्हणता येईल असा भाग आहे. तिथे किल्ल्यावर असलेल्या कॅसलची आणि कॅसलपर्यंत पोहोचण्यासाठी वापरल्या जाणार्‍या बेर्गबानची(bergbahn-डोंगरावर जाणारी रेल्वे) टिकीट्स मिळतात. या कॉर्नमार्क्टच्या एका बाजूला ही बेर्गबान तर समोरच्या बाजुच्या समांतर रस्त्याने चालत गेलं की उजव्याबाजुला ही नेकर नदी लागते. डावीकडे हायडलबर्ग मधल्या जुन्या जुन्या इमारती, तिथली चर्चेस, तसंच तिथून वर पाहिलं की दिसणारं सुंदर कॅसल. या नेकर नदीवर Altes Brücke नावाचा एक पूल आहे(जर्मन मधे Brücke म्हणजे पूल!)! हा पूल दगडी आणि बराच जुना आहे! या पुलावरून हायडलबर्ग कॅसलचा संपूर्ण देखावा आपल्याला दिसतो! या नदीने कितीतरी थोर तत्ववेत्त्यांना पाहिलं असेल नाही?! १४व्या शतकात ते विद्यापीठ स्थापन करणार्‍या रुपरेश्टला पाहिलं असेल! तो Altes Brücke ओलांडला की पुढे फिलॉसॉफेनवेग(philosophenweg) लागतो. या रस्त्यावर म्हणे तिथल्या विद्यापीठात शिकणारे-शिकवणारे अनेक तत्ववेत्ते तासनतास चर्चा करायचे.

img_4457

हायडलबर्ग कॅसल मधून दिसणारा Altes Brücke आणि नेकर नदी. (Photo Credits: Nikhil Godse)

img_4532

Altes Brücke वर उभं राहून दिसणारं हायडलबर्ग कॅसलचं सुंदर द्रुश्य. (Photo Credits: Nikhil Godse)

img_4533

नेकर नदी- Altes Brücke वरून (Photo Credits: Nikhil Godse)

बर्लिनची श्प्री

Spree- जर्मनमधे जिचा उच्चार श्प्री असा होतो! बर्लिनच्या मध्यवर्ती भागातून वळणं-वळणं घेत वाहणारी ही नदी! बर्लिन मधून फिरताना सतत आपलं अस्तित्वं जाणवून देणार्‍या दोन गोष्टी म्हणजे- तिथला टिव्ही टॉवर आणि ही श्प्री! सतत आपल्या बरोबर राहणारी ही श्प्री! मी बर्लिन पाहिलं साधारण नोव्हेंबरमधे! ऑटम संपून विंटरची चाहूल लागलेली असते. बोचरं वारं वहायला लागलेलं असतं यावेळी! मुळात जर्मनीचं अनिश्चित हवामान आणि त्यात हे दिवस म्हणजे- मधूनच पाऊस आणि मधूनच ऊन हे ठरलेलंच! या सगळ्या पार्श्वभूमीवर शहरातूनच वाहणारी ही नदी वातावरणातला गारवा अजून वाढवतच असते! बर्लिन मधल्या ठळक पर्यटन स्थळांपैकी बरीच शहराच्या मध्यवर्ती भागात आहेत. एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना एस-बान(S-Bahn) मधून सतत आपल्याला ही श्प्री भेटत रहाते! अनेकवेळा एस-बान नदीच्या पुलावरून जाते! मधूनच वाहणारं वारं नदीच्या पाण्यावर छान तरंगांची नक्षी उमटवत असतं! हे नदीवर ऊठणारे तरंग वरून जाणार्‍या एस-बानच्या खिडकीतूनसुद्धा एकदम स्पष्ट आणि फार सुंदर दिसतात! नोव्हेंबरमधे विंटर असल्यामूळे संध्याकाळी ४:३०-५ वाजता अंधार पडलेला असतो. खरंतर ब्रॅंडनबुर्गर गेट, डोम सारखी ठिकाणं आपली सकाळीच उजेडात पाहून झालेली असतात. पण त्यावरची रात्रीच दिसणारी रोशणाई पाहण्याची मजा वेगळीच नाही का? त्यामुळे वेळात-वेळ काढून आपले पाय आपोआप शहराच्या या भागाकडे वळतात! सगळं काही मनासारखं पाहून झाल्यावर डोम समोरच्या पुलावर आपण शांतपणे उभे राहतो! पुलावर वाहतुकीला परवानगी नसल्यामुळे तिथे तसं शांत असतं! आपलाच आवाज! पण एवढ्यात एखाद्या सुरेल गाण्याचे शब्द. किंवा एखाद्या वाद्यावर वाजणारी soothing पाश्चिमात्य धून आपल्या कानावर नाही पडली तरच नवल! हे असे संगीतातले अनाम आणि उपेक्षित हिरे भारतासारखे इथेही सापडतातच!

बॅम्बर्गची रेगनिट्झ

बॅम्बर्ग हे मुळातच इतकं गोड आणि छानसं गाव आहे! मी बॅम्बर्गला गेले होते त्यावेळी जर्मनीचा रियुनिफिकेशन डे होता! या दिवशी पुर्व आणि पश्चिम जर्मनीचं पुन्हा एकत्रीकरण केलं गेलं. हा दिवस जर्मन लोकं फार आनंदात साजरा करतात. या दिवशी मुळात सगळीकडे सुट्टी असते. बॅम्बर्गमधे त्या दिवशी फ्ली-मार्केट(जुन्या वस्तू विकण्याचं आणि विकत घेण्याचा बाजार) भरलं होतं! लोकं इतक्या उत्साहात आपल्याकडच्या जुन्या तरी सुस्थितीत असलेल्या वस्तू विकत होती! अगदी जुने कपडे, पुस्तकं, कटलरी, पेंटींग्स, दागिने,घड्याळं ते अगदी जुन्या सायकल्स पर्यंत! काही लोक स्वत: हौसेने जमा केलेल्या विविध वस्तू-रंगीत दगड, पिसं असं सुद्धा काय काय विकत होती! मधेच कोणीतरी गात होतं, एखादं वाद्य वाजवत होतं! सहाजिकच सगळीकडे उत्साही वातावरण होतं! ठिकठिकाणच्या कॉफी शॉप्स आणि स्टॉल्स मधून केक्स, वेगवेगळ्या कॉफीज्‌, कुकीज्‌, फ्लामकुखेन्स, मरोनीज्‌ सारख्या मस्त मस्त पदार्थांचा लोकं आस्वाद घेत होती! अश्या सगळ्या वातावरणाची मजा घेत-घेत, चालत-चालत आम्ही रेगनिट्झ नदीपाशी येऊन थबकलो. रेगनिट्ज ही माईन नदीची उपनदी. बॅम्बर्ग मधल्या ह्या नदीच्या आसपासच्या भागाला Little Venice (इंग्रजी)/Klein Venedig(जर्मन) म्हणूनही ओळखतात. नदीच्या दोन्ही बाजुनी, नदीला जवळ-जवळ चिकटून मध्ययुगीन काळातली Half timbered houses आहेत. आणि नदीमधून संथपणे जाणार्‍या बोटी! सगळं द्रुश्यं अगदी इटली मधल्या व्हेनिस शहरासारखं. त्या बोट-राइड्सना सुद्धा त्यामुळे गोंडोला राइड्स म्हणूनच ओळखतात. ते सगळं वातावरण इतकं प्रसन्न आणि मोहवणारं होतं की घरी परत जाऊच नये, तिथेच रेंगाळावं, शांत बसून रहावं असं वाटत होतं!

20151003_173706

रेगनिट्झ नदीला चिकटून असलेली मध्ययुगीन काळातली Half timbered houses

जर्मनीमधे नद्या पहाताना तिथे फेरफटका मारताना आपल्याला सतत दिसत राहतात ते स्वच्छ सुंदर काठ, नितळ पाणी, कुठेही कचरा फेकणं नाही, कपडे धुणं नाही. यामुळे वातावरणात प्रसन्नपणा असतो. तिथे अजून वेळ घालवावासा वाटतो. फ्रांकफूर्ट सारख्या गजबजलेल्या शहरात-नदी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून सुद्धा- नदीवर फारसा कलकलाट आणि बजबजपुरी जाणवत नाही. आपल्याकडे दुर्दैवाने महेश्वर सारखी मोजकी ठिकाणं सोडली तर नद्यांचे स्वच्छ सुंदर घाट दिसणं विरळाच. कदाचित शाळेतल्या लहान मुलाला जर ‘नदीकाठाचं चित्रं काढ’ असं सांगितलं तर तो नकळतच- नदी, तिच्या काठाशी कपडे धुणार्‍या बायका, नदीत अंघोळ करणारी गुरं, नदीच्या पाण्यात गाडी धुणारा एखाद-दुसरा माणूस असंच चित्रं काढेल. आपल्याकडे मोठा इतिहास आहे, पुराणातल्या कथांशी नातं सांगणारी देवालंयं नदीकाठांवर आहेत. त्या देवालयांची architectural value खूप मोठी आहे! पण हे सगळं जतन करून याचा प्रसार करायच्या ऐवजी, दुर्दैवाने आपल्यासाठी नदीचं महत्वं फक्तं कुंभमेळे, शाहीस्नान आणि निर्माल्यं टाकण्यासाठीच उरलय का असं कधी-कधी वाटतं. नदीत डुबकी मारून पापं धुण्याच्या नादात आपण केवढं मोठं blunder करतोय हे कधी आपल्या लक्षात येईल. But let’s not lose hope. Clean Ganga Mission कधीतरी यशस्वी होईल. त्याचप्रमाणे इतर नद्याही स्वच्छ होतील अशी आशा करुया आणि त्याकरता थोडा आपलाही खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करुया! Let’s try to restore the glory and beauty of the flowing story-tellers of India!

Advertisements

19 thoughts on “भेट जर्मन नद्यांची!

 1. Pradnya Sawargaonkar says:

  ख़ूप छान लिखाण. मनापासून आणि अभ्यासपूर्ण.
  भारतीय नद्यान्पासून सुरुवात आणि शेवट मला विशेष आवडला. त्यामुळे लिखाणाला एक contxt मिळतो . Keep writing.

  Liked by 1 person

 2. m says:

  अगं, काय भारी लिहिलंयस. किती प्रेमाने आणि आपुलकीने. मला आमच्या कृष्णाबाईची आठवण झाली. जर्मनीला जाणं होईल न होईल प्रत्यक्ष, तुझं वाचून जाऊन आल्यासारखं वाटलं Namesake! लिहीत राहा.

  Liked by 1 person

 3. प्रीति छत्रे says:

  खूप छान, माहितीपूर्ण (आणि अभ्यासपूर्ण) लेखन. आवडलं. जर्मनीतल्या प्रसिद्ध नद्यांपैकी कुठल्या नद्यांचे संगम प्रसिद्ध आहेत का?

  Liked by 1 person

  • mrunmayiparchure says:

   Thanks Priti, I am glad that you liked it! :). जर्मनीमधल्या नद्यांचे प्रसिद्ध असलेले संगम अजुनतरी माझ्या ऐकण्यात किंवा वाचण्यात आले नाहीत. पण असं काही असल्याचं मला कळलं आणि मला ती जागा explore करायचा chance मिळाला तर मी नक्की लिहीन त्यावर. 🙂 🙂

   Like

 4. Hrucha Manke says:

  अप्रतिम लेखन !!!! वाचताना खुप fresh वाटत होते. अगदी नदी काठी फेर फटका मारून आल्या सारखं. तुझं लिखाण खुप जीवंत वाटत ते तसचं ठेव.

  Like

 5. aroundindiaghansham says:

  सुंदर वर्णन, नदीच्या प्रवाहासारखच प्रवाही. पाणी हे माणसाच्या शरिराचाही प्रमुख भाग असतं. म्हणून काय माणसाला पाण्याची ओढ असावी. त्यामुळेच नद्या, समुद्र माणसाला हेलावून टाकतात. आणि अर्थातच या पाण्याभोवती वाढलेली हजारो वर्षांची संस्कृती वेगळाच भावनिक ओलावा तयार करते. मग ते पाणी भारतातले असो किंवा जर्मनीतील. असो. तुमचे सगळेच लेख अशाच सुंदर शैलीचे आहेत. अभिनंदन

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s