ओरिगामी- एक वेड!

मी तशी खूप छांदिष्ट मुलगी आहे! म्हणजे एखादी गोष्टं आवडली की काही दिवस तिच्याच मागे लागायचं! इतकं की काही दिवस ती गोष्ट माझा आवडता छंद होऊन बसते! मग हळूहळू जेव्हा समजायला लागतं की ‘ये अपने बस की बात नही’ किंवा ‘या सगळ्यात फारंच वेळ आणि पैसा खर्चं होतोय’ तोपर्यंत मला नवं काहीतरी सापडलेलं असतं! चित्रकला, भरतनाट्यम, बॅडमिंटन, कॅलिग्राफी, फोटोग्राफी एवढंच काय अगदी ढोलपथक सुद्धा मी join केलं होतं! ह्या सगळ्याचं वेड फार तर फार वर्षभर टिकलं असेल! No Doubt, या सगळ्या activities नी मला त्या-त्या वेळेला खूप आनंद दिला! त्या-त्या क्षेत्रातली थोडीफार जाण दिली, आणि पुरेसा वेळ आणि पैसे मिळाले तर यातल्या अनेक गोष्टी मी करेन ही आशा तयार केली! असंच एकदा लागलेलं वेड म्हणजे ओरिगामी!

ओरिगामीची आणि माझी पहिली लक्षात राहिलेली ओळख ही-अनिल अवचटांनी लिहिलेल्या आणि माझ्या अत्यंत आवडत्या ‘छंदाविषयी’ या पुस्तकात झाली! त्यांनी केलेल्या ओरिगामीच्या modelsचे फोटोग्राफ्ससुद्धा त्यांच्या पुस्तकात आहेत! ते पाहून मी वेडावूनच गेले! हे असं मस्तं आपल्यालासुद्धा करत यायला हवं! माझे आई-बाबासुद्धा असेच उत्साही! त्यांनी लगेच आमच्या पुणे ट्रिपमधे आपल्या मुलींकरता ‘केसरी’च्या प्रेसमधे जाऊन इंदुताई टिळकांच्या ओरिगामीच्या सगळ्या पुस्तकांचा संचच विकत आणला! झालं! पुस्तकात पाहून एखादं तरी model successfully जमावं याची धडपड सुरू झाली! पुस्तकात सुरवातीला दिलेल्या खुणा/ आकृत्या काहिही न बघता मी निघाले होते सरळ छानसं model बनवायला! पण छे!पुस्तकातले ते वेगवेगळे folds, कुठलेकुठले bases, आणि पुस्तकातल्या असंख्य खुणांनी मला भंडावून सोडलं होतं. काहीच जमेना! पुस्तकातल्या सुरवातीच्या instructions न वाचता कसं जमेल नाही का? कंटाळून असंच सोडून दिलं! पण ओरिगामी बद्दलचं आकर्षण अजूनही मनात होतं ना! कुठलाही प्रश्न पडल्यावर आधी Google, YouTube वर जावं, generally उत्तर मिळतं हे जेव्हा कळायला लागलं तेव्हा माझी आणि ओरिगामीची खरीखुरी मैत्री झाली! YouTube वरच्या असंख्य विडियो ट्युटोरियल्सनी माझा प्रश्न सोडवला! मग दोन-तीन वर्षं गणपतीला ओरिगामीची theme घेऊन आरास झाली! कधीतरी एखादं फूल-फूलपाखरू करून गिफ्ट्स देऊन झाली!

पण ओरिगामीने माझी खरीखुरी साथ दिली ती जर्मनीमधे! ओरिगामी ही अशी मस्त कला आहे ना की यात कुठेही, कोणीही कुणाची copy करू शकतो! म्हणजे खरंतर या कलेत हेच expected असतं! कोणितरी एक एखादं model design करतो आणि बाकीचे त्याचं अनुकरण करतात. आणि पुन्हा फार नखरे नाहित! कुठलाही कागद, अगदी वर्तमानपत्राचा तुकडाही पुरतो एखादं model बनवायला! कात्री-फेविकॉलची सुद्धा गरज नाही! आणि बरीचशी models फार वेळही घेत नाहीत! जर्मनीमधे आले तेव्हा पहिल्यांदाच घरापासून लांब आले होते, वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्नं करत होते. आले त्यानंतर लगेचच इथे शिशिर ऋतु(आपल्या भाषेत त्याला autumn किंवा fall असं म्हणतात 😉 ) संपून थंडी सुरु झाली होती. दिवसभर असलेलं dull वातावरण, दुपारी ३-४ वाजताच पडणारा अंधार, बोचर्‍या थंडीमुळे बाहेर जाणं नकोसं होई! आठवडाभर युनिवर्सिटी-अभ्यास यामधे वेळ जात असे पण सुट्टीचा दिवस नकोसा होई! त्यादिवशी घरच्या फोन व्यतिरिक्त कोणाशी बोलणं होत नसे! त्यादिवशी दुकनांनासुद्धा सुट्टी असल्याने रस्त्यावर चिटपाखरू सुद्धा दिसत नसे! त्यावेळी खूप एकटेपणाचा त्रास व्हायचा! आजुबाजुला दिसणार्‍या लोकांच्या कपड्यांचे रंगसुद्धा काळपट-गडद! या सगळ्यामधे adjust होता होता ओरिगामी पुढे आली. इथे सुपरमार्केट्समधे तिथल्या वेगवेगळ्या ऑफर्सबद्दल, नविन आलेल्या प्रॉडक्ट्सबद्दल माहिती देणारी बुकलेट्स ठेवलेली असतात. तसंच इथे घराच्या लेटरबॉक्स मधे सुद्धा अश्या जाहिरातींची खूप बुकलेट्स टाकली जातात. त्यातली काही चांगल्या ग्लॉसी पेपरची असतात! बस्स! मला अजून काय हवं होतं! कागदाची व्यवस्था झाली! पुढे हळूहळू ओरिगामीचे रंगीत कागद स्वस्तात कुठे मिळतात याची माहिती मी काढली आणि थोडे पैसे वाचवून तसे कागदही आणले! काही गिफ्ट म्हणून मिळाले! झालं मग! एखादं model करावसं वाटलं की ते पहिल्यांदा जाहिरातींच्या कागदाचं करायचं! ते व्यवस्थीत जमलं की चांगल्या रंगीत कागदानी ते पुन्हा करायचं! अशी कित्येक मॉडेल्स मी केली, अजूनही करते! ४-५ वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरं, डेलियाचं फूल, ख्रिसमस मधे स्नोफ्लेक, गोगलगाय, तारा, बाहुलीचा फ्रॉक, cubeचं गुलाबात रुपांतर होणारं एक मॉडेल, मॉड्युलर ओरिगामीचा एक बास्केटा तारा, चेरी ब्लॉसमची दोन वेगळी फुलं, पणत्या, 3-D ओरिगामीचे हंस आणि कमळ, लिली-ट्युलिपची फुलं, एक किडा, पोपट आणि अजून कितितरी. यात काही किरिगामीची सुद्धा मॉडेल्स केली. (ओरिगामी मधे फक्त कागदाच्या घड्या घालून वेगवेगळे आकार, पानं, फुलं, पक्षी, किडे, प्राणी बनवले जातात तर किरिगामी मधे कात्रीचा सुद्धा उपयोग केला जातो.) यातली थोडी माझ्याकडे ठेवली, जर्मनीमधे केलेली तर बरीचशी गिफ्ट म्हणून देऊन टाकली.  त्यात खूपसे असेही होते की खूप प्रयत्न करून सुद्धा जमले नाहीत. विशेषतः किडे आणि काही प्राणी हे सहज जमतच नाहीत. माझं स्ट्रगल-प्रॅक्टीस चालू आहे त्यांच्यावर!

एकटी रहात असल्याने शेअर करायला आजुबाजुला कोणी नसतं इथे जर्मनीमधे! सहाजिकच ओरिगामीचं एखादं चांगलं मॉडेल जमलं की त्याचा फोटो Instagram, Facebook वर share केला जातो! त्यावरच्या लोकांच्या रिऍक्शन्स सुद्धा खूप कौतुक करणार्‍या आणि encouraging असतात. त्यामुळे ओरिगामी करण्याचा हुरुप येतो. काही प्रतिक्रिया अगदी मजेशिरही असतात. त्यांची गंमत वाटते. शेवटी, मला यातून खूप आनंद मिळतो आणि माझा वेळ खूप छान जातो हे माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. एका साध्या कागदाच्या तुकड्याला वेगवेगळ्या प्रकारे घड्या घालून किती सुंदर-सुंदर गोष्टी तयार होतात याची मला फार गंमत वाटते. आणि त्यातले थोडेसे प्रकार तरी आपण करू शकतो याचा फार आनंद होतो.

मी केलेल्या ओरिगामीच्या काही मॉडेल्सचे फोटो इथे share करत आहे. यातली जवळ-जवळ सगळी मॉडेल्स मी YouTube वरच्या video tutorials वरून केली आहेत.

431730_287433871358248_113235307_nकुसुडामा फूल- या मधे चौकोनी कागदाची एक पाकळी तयार होते. अश्या पाच पाकळ्यांचं एक फूल होतं. शोभेकरता मधे एक मोती चिकटवला होता

11124243_709935462441418_7226459509186587214_oहा सुद्धा सहा मॉड्युल्सनी तयार केलेला एक तारा. जर्मनीमधेच दिवाळीत अशी माळ तयार केली होती.

11295542_652514251516873_8243012400031871308_nस्नोफ्लेक-षटकोनी बटर पेपरचा तयार केलेला हा स्नोफ्लेक. बटर पेपरच्या घड्यांमुळे येणार्‍या सुर्यप्रकाशाची intensity vary होते. त्यामुळे खर्‍या स्नोफ्लेक सारखा look येतो. हा पहिल्यांदा बनवायला जरासा अवघड आहे. पण एकदा जमला की परत करणं खूपच सोपं आहे. या बद्दल विशेष सांगायची गोष्ट अशी की, जर्मनी मधे ख्रिस्टमसच्या काळात अश्या प्रकारे केलेले कागदाचे स्नोफ्लेक घराच्या काचेच्या खिडक्यांना आतुन लावलेले दिसतात. इथल्या सगळ्या घरांच्या खिडक्या एकाच प्रकारच्या असतात. अश्या खिडक्यांना लावलेले हे रंगीबेरंगी स्नोफ्लेक्स सुंदर दिसतात. Designer- Dennis Walker

11742794_671346639633634_8459736693811669753_nचेरीब्लॉसम-हे पाच वेगवेगळ्या तयार केलेल्या पाकळ्या एकमेकांत अडकवून तयार केलेलं चेरीब्लॉसमच्या फूलाचा एक प्रकार.

12079686_703049723129992_3696331930523468835_nओरिगामी स्वॅलोटेल बटरफ्लाय- बनवायला जरासं अवघड आहे खरं. पण दिसतं फार सुरेख. Deigner-Evi Binzinger

12496476_731700146931616_3340773843124815733_o

हा करायला खूपच सोपा पण गोड दिसणारा फ्रॉक. याचा डिझायनर मात्र कोण आहे ते कळलं नाही.

12698312_745236762244621_8116221743607650187_o

मधलं डेलियाचं फूल आणि दोन किरिगामीची फुलपाखरं. डेलियाचं फुल बनवायची पद्धत थोडी स्नोफ्लेक सारखी आहे. आणि फुलपाखरं तर बनवायला खूपच सोपी आहेत. डेलियाचं डिझाईन हे Traditional Japaneese design आहे.

13116210_783611281740502_5073269638620185511_o

Bascetta Star- Paolo Bascetta नावाच्या माणसाने तयार केलेलं हे मॉडेल. मॉड्युलर आणि जिओमेट्रिक ओरिगामी वर बरंच काम करणारा हा एक इटालियन माणुस. त्याच्या website वर आपल्याला अनेक मॉडेल्स पहायला मिळतात

13517549_808014495966847_1999892321909018825_o

गोगलगायी- कसल्या गोड आहेत ना!? मागचा शंखाचा भाग बनवणं तसं जरासं challenging आहे. पण जमतं एखाद-दुसर्‍या प्रयत्नात. Designer- Eric Gjerde

20150718_121804

चेरी ब्लॉसमचा अजून एक प्रकार. पंचकोनातून तयार केलेला. मला हा जास्त आवडला आधीच्यापेक्षा. अशी अनेक फूलं तयार करून, झाडाच्या वाळून खाली पडलेल्या एखाद्या लहानश्या फांदीवर ती फुलं खोवून, खोलीच्या एखाद्या कोपर्‍यात किंवा खिडकीत ती फांदी अडकवली तर खरोखरं चेरीब्लॉसमची फूलांनी बहरलेली सुंदर फांदी तोडून आणल्यासारखं वाटतं. Designer: Fumiaki Shingu

img_20161218_224615

हा किरिगामीचा बो- अगदी नुकताच करून पहिलाय. फारच सोपा आहे. याचा डिझायनर मात्र कोण आहे ते कळलं नाही.

photogrid_1482362938128

ओरिगामीचे हंस आणि कमळ. एक हंसाला जवळ-जवळ १५०० पिसेस लागतात. त्यावेळी माझ्या पेशन्सची खरोखर परिक्षा घेतली होती या हंसांनी. आम्ही जवळजवळ २ महिने आधीपासून हे पिसेस करायला घेतले होते. तरी गणपती बसण्याच्या एक दिवसआधी पर्यंत खात्री नव्हती की हे हंस उभे राहतात की मान टाकतात. शेवटी हंस उभे करण्यात यशस्वी झालो.

photogrid_1482363169303

हे सुद्धा ६ मॉड्युल्सचं ‘Magic Rose’. Rose आणि cube हे असे बदलता येतात. Designer-Valarie Vann

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s